रणजीत डिसले गुरूजींच्या नाराजीची शिक्षणमंत्र्यांकडून दखल, रजा मंजूर करण्याचे आदेश
X
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवलेले रणजीत डिसले गुरूजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी अमेरीकेत संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळाल्याने शिक्षणविभागाकडे रजा मागितली होती. मात्र त्यांना रजा मंजूर करण्यास शिक्षण विभागाने नकार दिला होता. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. तसेच रणजीत डिसले यांनी नाराज होऊन राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. यासंदर्भात सर्वत्र चर्चा होऊ लागल्यानंतर रणजीत डिसले यांची दखल घेत थेट शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली आणि त्यांचे रजा मंजूर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
"सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक @ranjitdisaleजी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे." अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
'ग्लोबल टीचर पुरस्कार' मिळवणाऱ्या रणजीत डिसले गुरुजींमुळे जगात देशाची मान अभिमानाने उंचावली. तर त्यांना अमेरीकेत संशोधन शिष्यवृत्ती जाहीर झाल्याने त्यांनी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांची रजा मागितली होती. पण त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण देत शिक्षण विभागाने त्यांचा अर्ज नाकारला होता. त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तर डिसले गुरूजींनी त्यांची अडवणूक केली जात असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. तर ज्या व्यवस्थेमध्ये आपल्या कामाचा आदर केला जात नाही, अशा ठिकाणी काम करण्याच्या मानसिकतेत आपण सध्या नाही, असे डिसले गुरूजींनी सांगितले होते.
रणजीत डिसले गुरूजींनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर येत्या दोन तीन दिवसात ते राजीनामा देतील, असे म्हटले जात होते. त्यावरून शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरूजींनी केलेले आरोप खोडून काढले होते. तर रणजीत डिसले यांनी रजेसाठी फक्त अर्ज केला होता. त्यासोबत कागदपत्रे जोडली नव्हती. मात्र परवानगीसाठी ते थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले. योग्य प्रस्ताव आल्यास रजा द्यायला काही अडचण नाही, असे लोहार यांनी स्पष्ट केले आहे. पण योग्य कागदपत्रे जोडायची नाहीत आणि रजा मंजूर झाली नाही म्हणायचं याला अर्थ नाही, अशी नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
रणजीत डिसले यांच्यावर आरोप काय?
दरम्यान रणजीत डिसले यांनी जागतिक पातळीवर पुरस्कार मिळवला असला तरी ज्या शाळेत ते प्रतिनियुक्तीवर होते, त्या शाळेत ते ३ वर्ष हजरच राहिले नाहीत, असा अहवाल चौकशी समितीने दिल्याची माहितीही किरण लोहार यांनी दिली आहे. या समितीमध्ये ५ सदस्य होते. " चौकशीमध्ये जी काही माहिती समोर आली आहे ती आम्ही प्रशासनासमोर मांडली आहे, आता जिल्हा परिषद प्रशासन योग्य निर्णय घेईल" अशी माहितीही त्यांनी दिली. पण आपल्यावर टीका होते म्हणून आपण रजा मंजूर करावी असे होणार नाही, असेही लोहार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान डिसले गुरूजींच्या दीर्घ रजेमुळे त्यांच्या शिकवणाच्या कामावर होणाऱ्या परिणामाचे कारण देण्यात आले होते. तसेच अशा अवांतर उपक्रमांमधून डिसले गुरूजींची नियुक्ती झालेल्या परितेवाडी शाळेत काय बदल झाला याची चौकशी करण्याचा निर्णय जि.प, शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच गेल्या तीन वर्षांत गणजीत डिसले यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तसेच ते काम करत असलेल्या परितेवाडी शाळेसाठी काय योगदान दिले हे तपासायचे असल्याचे सांगून त्यांची सर्विस फाईल फाइल शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी मागवली आहे. रणजीत डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळणं ही अभिमानीची बाब आहे, पण त्यांच्या या कार्याचा परितेवाडी शालेला काय उपयोग झाला हे तपासावे लागेल, असे किरण लोहार यांचे म्हणणे आहे.
मात्र निर्माण झालेल्या वादानंतर अखेर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेप करत डिसले गुरूजींना रजा मंजूर केली आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडणार आहे.