Hunger Index: भारत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे...
X
भारतात गरीबांसाठी अनेक योजना चालवल्या जातात, ज्यात शेकडो कोटींचे बजेट देखील मंजूर केले जाते. सरकारही अनेक वेळा असा दावा करते की, देशातील कोट्यावधी लोकांना अन्न आणि इतर उपयुक्त गोष्टी पुरवल्या जात असल्याचा दावा करते. मात्र, मोदी सरकारच्या काळात हंगर निर्देशांकात (जागतिक कुपोषण निर्देशांकात) भारताचे स्थान आणखी खाली गेलं आहे. एवढंच नाही तर, या निर्देशांकात भारत हा शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही खाली गेला आहे.
भारत सरकारने गरीबांसाठी आम्ही मदत केली असे लाखो दावे केले असतील, मात्र, ग्लोबल हंगर इंडेक्स (जीएचआय) 2021 च्या यादीत 116 देशांमध्ये भारताला 101 वे स्थान दिले आहे. दरम्यान, 2020 मध्ये 107 देशांमध्ये भारताचं स्थान हे 94 व्या क्रमांकावर होतं. एकूणच, 2021 च्या रँकिंगनुसार, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळने भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना ० ते १०० असे गुण दिले जातात. त्यानुसार त्यांची क्रमवारी ठरवली जाते. यामध्ये ० गुण हे सर्वोत्तम समजले जातात, याचा अर्थ एकप्रकारे त्या देशात भुकेची स्थिती काळजी करण्यासारखी नाही असाच होतो.
याबाबतचा अहवाल 'कन्सर्न वल्र्डवाइड' ही आयरिश संस्था तसंच 'वेल्ट हंगर हिल्फी' ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला असून भारताची परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. भारताचा Global Hunger Index 2000 मध्ये 38.8 असणारा स्कोअर, 2012 ते 2021 दरम्यान 28.8 - 27.5 पर्यंत घसरला.
Global Hunger Index मध्ये कमी पोषण, उंचीच्या तुलनेत कमी वजन, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कुपोषण, बालमृत्यू दर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात. दरम्यान, वर्ष 2020 मध्ये 107 देशांमध्ये भारताचा 94 वा क्रमांक होता. आता ते 116 देशांमध्ये 101 व्या स्थानावर आले आहे.
अहवालानुसार, भारतात चाईल्ड वेस्टिंगचे प्रमाण 1998 ते 2002 दरम्यान 17.1 टक्क्यांवरून वाढून 2016 ते 2020 दरम्यान 17.3 टक्के इतकं झालं आहे.
अहवालात भारताने इतर निर्देशांकामध्ये सुधारणा केल्याचं दिसून येते त्यामध्ये बालमृत्यूचे प्रमाण, अपुरे अन्न सेवन केल्यामुळे बालमृत्यूचे होणारे प्रमाण आणि कुपोषणाचे प्रमाण यामध्ये घट झाल्याचं दिसून येते.
अहवालानुसार, आपले शेजारी देश नेपाळ (76), बांगलादेश (76), म्यानमार (71) आणि पाकिस्तान (92) देखील उपासमारीमुळे चिंताजनक स्थितीत आहेत. मात्र, या सर्वांनी भारताच्या तुलनेत आपल्या नागरिकांना अन्न पुरवण्यामध्ये चांगले काम केले आहे.
कोविड - १९ च्या प्रभावामुळे अनेक लोक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, पाचपेक्षा कमी GHI स्कोअर असलेल्या अठरा देशांच्या यादीत चीन, ब्राझील आणि कुवैत या देशांनी स्थान मिळवलं आहे.