Home > News Update > आता पोस्टातून मिळणार गंगाजल ; प्रशासनाच्या निर्णयावर जोरदार टीका

आता पोस्टातून मिळणार गंगाजल ; प्रशासनाच्या निर्णयावर जोरदार टीका

आता पोस्टातून मिळणार गंगाजल ; प्रशासनाच्या निर्णयावर जोरदार टीका
X

अहमदनगर : कधी काळी संपर्कासाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पोस्टाला मोबाईलच्या जमान्यात उतरती कळा लागली. मामाचे पत्र घेऊन येणारा पोस्टमन काळाच्या पडद्या आड गेला. देशातील सर्वात मोठं सरकारी खातं म्हणजे पोस्ट खातं हे देखील हळूहळू मागे पडतांना दिसत आहे. मात्र, आधार कार्ड, पोस्टाच्या विविध निधी संकलन योजना, या आणि असा विविध सरकारी योजनासाठी आता पोस्टाचा वापर केला जातो. आता पोस्टामार्फत तुम्हाला गंगा जल देखील मिळणार आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये गंगा नदीचे जल, पवित्र जल म्हणून मानले जाते. अनेक धार्मिक विधीमध्ये या गंगा नदीच्या पाण्याला विशेष महत्त्व आहे. हे जल प्रत्येकाला सहजा-सहजी आपल्या घरामध्ये उपलब्ध करता येत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन भारतीय डाक विभागाने श्रावण महिन्यामध्ये खास देशातील सर्व नागरिकांसाठी पवित्र असणारे गंगाजल आता संपूर्ण देशात पोस्टामार्फत उपलब्ध करून दिले आहे.

हे गंगाजल आता देशातील बहुतांश पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व श्रीरामपूर येथील प्रधान डाक कार्यालयात आता गंगाजल मिळणार आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व पोस्ट ऑफिस मध्ये देखील याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. अशी माहिती अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक एस. रामकृष्णा यांनी केले आहे.

दरम्यान हे गंगाजल थेट गंगोत्री येथील असून ते उत्तर काशी येथून पॅकिंग करून देशातील विविध भागांमध्ये वितरीत केले जाते. सध्या गंगाजल 250 मिली च्या प्लास्टिक बाटलीमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत फक्त 30 रुपये एवढी असणार आहे. अशी माहिती डाक निरीक्षक संदीप हदगल यांनी दिली आहे.

मात्र, देशातील एवढ्या मोठ्या यंत्रणेचा अशा पध्दतीने वापरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे तर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अशा पध्दतीने सरकारी यंत्रणाचा वापर धार्मिक गोष्टींसाठी करणं अत्यंत चुकीचे असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. असा पध्दतीने यंत्रणांचा वापर केल्याने देशात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा देखील प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अनेकांनी तर थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यावरून निशाणा साधला आहे. गंगाजल प्रत्येक घरात पोहोचवाचे आहे की स्वत:चा अजेंडा असा सवाल अनेकांनी केला आहे.

Updated : 2 Aug 2021 1:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top