Home > News Update > गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यात कोरोना वाढीचा वेग

गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यात कोरोना वाढीचा वेग

राज्यात दुसरा कोरोना लाटेचा संसर्ग कमी झाला नसताना गणेशोत्सव आणि सणासुदीच्या तोंडावर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या वाढीने वेग घेतला आहे.

राज्यात काल दिवसभरात पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली असली तरी राज्यात नवे ४ हजार २१९ नवीन करोनाबाधित आढळून आले.

२ हजार ५३८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. ५५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे.

अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९५,२३६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,८७,०२५ झाली आहे. आजपर्यंत राज्यात १३८०१७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५५,१९,६७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८७,०२५(११.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९२,५१० व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत. तर, १,९१९ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणता आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५०,२२९ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

राज्य सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले असताना मोठ्या संख्येने शहरांमध्ये गर्दी होत असून प्रवासाच्या निमित्ताने अनेक नागरिक बाहेरगावी जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या लाटेचा संसर्ग अधिक वाढेल असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Updated : 10 Sept 2021 8:33 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top