Home > News Update > पावसाळ्यापुर्वी गडचिरोलीचे जिल्हा परिषद सीईओ पोहचले दुर्गम भागातील बिनागुंडात

पावसाळ्यापुर्वी गडचिरोलीचे जिल्हा परिषद सीईओ पोहचले दुर्गम भागातील बिनागुंडात

पावसाळ्यापुर्वी गडचिरोलीचे जिल्हा परिषद सीईओ पोहचले दुर्गम भागातील बिनागुंडात
X

देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षानंतरही दुर्गम भागात मुलभुत सोयी सुविधा पोहचल्या नाहीत. त्यातच पावसाळ्यातील चार महिने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागांचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटतो. त्यामुळे जिल्हा परिषद सीईओ कुमार आशिर्वाद यांनी दुर्गम भागातील बिनागुंडा गावाला भेट दिली.

पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांचा प्रमुख शहरांपासून संपर्क तुटतो. त्यामुळे अशा प्रकारे संपर्क तुटणाऱ्या गावांपैकी फोदेवाडा आणि बिनागुंडा या अतिदुर्गम आणि संवेदनशील गावांना गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सीईओंनी भेट दिली. तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.




मान्सुन अरबी समुद्रात दाखल झाला आहे. त्यामुळे मान्सुनपुर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोलीचे जिल्हा परिषद सीईओ कुमार आशिर्वाद यांनी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिनागुंडा गावाला भेट दिली. यावेळी कुमार आशिर्वाद यांनी 8 ते 10 किलोमीटर अंतर पायपीट करत डोंगराळ भाग, जंगलातून बिनागुंडा या गावात पोहचले. त्यानंतर त्यांनी बिनागुंडावासियांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी जिल्हा परिषद सीईओंसमोर समस्यांचा पाढा वाचला.

कुमार आशिर्वाद यांनी रस्ते, वीज, पाणी याशिवाय आरोग्याच्या समस्यांचा आढावा घेतला. तसेच यावेळी नदी नाल्यांवरील पुल नसल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उभ्या राहतात. त्यामुळे त्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी स्वयंसेवक आणि आशा वर्कर्स यांना एकत्रित करून प्राथमिक उपचारासाठीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, नोडल अधिकारी डॉ. पंकज हेमके आणि डॉ. अक्षय लाड हे उपस्थित होते.




यावेळी कुमार आशिर्वाद यांनी जलजीवन योजनेंतर्गत अतिदुर्गम भागातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी पोहचवण्याचे नियोजन आहे. तर डिसेंबरपर्यंत प्रत्येक नागरिकाला शुध्द पिण्याचे पाणी मिळेल, असे सांगितले. तसेच या भागात रस्त्यांची गंभीर समस्या असून त्यावरही प्रशासकीय पातळीवर काम केले जाईल. याबरोबरच वीजेच्या समस्येवर उपाय म्हणून प्रशासनाने ग्रामस्थांना सोलर पॅनल दिले आहेत. त्याचा या भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेचे सीईओ कुमार आशिर्वाद यांनी दिली.

Updated : 23 May 2022 4:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top