लोहारे येथील जवान धीरज शाम साळुंखे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
X
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील दोन लष्करी जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. लोहारे येथील धीरज शाम साळुंखे आणि सचिन चिकणे या जवानांचे रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. जवानांना समाजातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या घटनेने सबंध रायगड हळहळला आहे.
धीरज साळुंखे 2014 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. एएसई डिपार्टमेंटमध्ये सात वर्षे कार्यरत असताना 2017 मध्ये त्यांचा विवाह झाला होता, गेल्या दीड वर्षापूर्वी त्यांना ब्लड कॅन्सर असल्याचे निदान झाल्याने त्याच्यावर दिल्लीतील लष्करी इस्पितळामध्ये उपचार सुरू झाले. दोनच महिन्यांपूर्वी धीरज यांनी ब्लड कॅन्सरवर मात करून पुन्हा कर्तव्यावर रूजू झाले होते. गेल्या चार पाच दिवसांपासून धीरज याला अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा दिल्लीतील लष्करी इस्पितळामध्ये दाखल झाल्यानंतर आजार बळावल्याने बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
दिल्ली येथील लष्करी तळामध्ये जवान धीरज साळुंखे आणि जवान सचिन चिकणे यांना लष्करी इतमामात सलामी देण्यात आल्यानंतर धीरज याचे पार्थिव मुंबईला रवाना झाले. मुंबईमध्येही जवान धीरज साळुंखे यांना सलामी देण्यात येऊन पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
जवान सचिन चिकणे याचे पार्थिव पुणे येथे नातेवाईकांकडे रवाना करण्यात येऊन तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलादपूर येथे जवान धीरज यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा सजवलेल्या ट्रकवरून 'जबतक सूरज चाँद रहेगा। धीरज तेरा नाम रहेगा।'अशा घोषणांनी आसमंत दुमदुमत काढण्यात आली.
पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई, निवासी नायब तहसीलदार समीर देसाई, एपीआय प्रशांत जाधव यांनी शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. यावेळी समाजातर्फे माजी उपसभापती संभाजी साळुंखे, रघुनाथ वाडकर, नामदेव उतेकर, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी जाधव आदींनी जवान धीरज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. याप्रसंगी उपस्थितांनी जवान सचिन गणेश चिकणे यांनाही श्रध्दांजली अर्पण केली.
बुधवारी धीरजच्या मृत्यूची बातमी पोलादपूरकरांना शोकाकूल करीत असताना दुपारी कुडपण येथील जवान सचिन चिकणे यांचा उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूची बातमी धडकली आणि संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील जनतेवर दु:खाचे सावट पसरले.