ॲट्रॉसिटी मागे घ्या म्हणत 10 तास अंत्ययात्रा अडवली, भीम सेनेची आरोपींविरोधात कारवाईची मागणी
X
सोलापूर : माळवाडी ता. माळशिरस येथील मातंग समाजाचे धनाजी अनंता साठे यांचं २० ऑगस्ट ला निधन झालं. त्याच दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास प्रेत अंत्यविधीसाठी घेऊन जात असताना गावातील लोकांनी पोलीस अधिकारी व तहसीलदार यांनी संगनमत करून प्रेताचा टेम्पो अडवून ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहेय अंत्यविधी करण्यास मजाव करणाऱ्या या सर्व लोकांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नातेवाईकांसह युवा भीम सेना, अखिल भारतीय सेना यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मोहोळचे तहसिलदार राजशेखर लिंबरे यांना निवेदन देण्यात आले.
काय आहे निवेदन?
मौजे माळेवाडी(बो) ता.माळशिरस येथील मातंग समाजाचे धनाजी अनंता साठे यांचं २० ऑगस्ट ला रात्री निधन झालं. त्याच दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत व्यक्तीचे प्रेत स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी टेम्पोमध्ये घेऊन जात असताना रवींद्र शहाजी पाटील, राजेंद्र भीमराव पांढरे, चंद्रकांत मारुती पांढरे, संभाजी नाताजी कुदळे, जयराम मच्छिंद्र पांढरे, राहुल शिवाजी कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छिंद्र पांढरे, विनायक शिवाजी कुदळे, प्रवीण मधुकर कुदळे, सुभाष सदाशिव पांढरे, संदीप भगवान कुदळे, अमोल दत्तात्रय कुदळे सर्व राहणार माळेवाडी (बोरगाव) या लोकांनी एकत्र येऊन व यापूर्वी पोलिसात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून अंत्यविधीसाठी जाणारा प्रेताचा टेम्पो अडविला. व तुम्ही यापूर्वी आमच्या विरुद्ध पोलिसात दाखल केलेला गुन्हा माघारी घेतो. असे लिहून द्या. असे म्हणत आरोपींनी प्रेत असलेल्या मयताचा टेम्पो व अंत्यविधिस जाणाऱ्या इतर नातेवाईक लोकांचा रस्ता जवळपास ८ ते १० तास अडविला असल्याची फिर्याद वरील संदर्भानुसार मयताचा नातेवाईक विमल सुरेश साठे रा. माळेवाडी यांनी अकलूज पोलीस येथे दिली आहे.
रस्ता अडविला त्याठिकाणी संबधित पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, काही पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचारी सामील झाल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे.
तरी या प्रकरणातील संबधित दोषी आरोपींवर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पीडित कुटुंबाच्या जीवितास समाजकंटकाकडून धोका निर्माण झाला असल्याने त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देऊन सदर कुटूंबाचे नव्याने पुनर्वसन करण्यात यावे. पीडित कुटूंबियांना शासनाच्या वतीने पुनर्वसनासाठी व उदरनिर्वाहासाठी योग्य ती मदत देण्यात यावी. आपल्या अधिकाराचा अमर्याद गैरवापर करून एका अनुसूचित जातीच्या इसमाचे प्रेत अंत्यविधिस नेताना रस्त्यात अडवून व आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या या प्रकरणीतील दोषी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, तहसिलदार, महसूल कर्मचारी यांना सह आरोपी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम सेनेन निवेदनाद्वारे दिला आहे.