Petrol Price Today: देशभरात सलग तिसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर : महाराष्ट्रात दर कमी होण्याची शक्यता
X
नवी दिल्ली : देशातील सरकारी तेल कंपन्यांनी (IOCL) आज (9 नोव्हेंबर) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहे. आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशभरात सलग तिसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना काहीसा का होईना पण दिलासा मिळाला आहे.
तेल कंपन्यांनी आज सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल 109.96 आणि डिझेल 94.13 रुपये प्रतिलीटर आहे.
दरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, हे स्पष्ट होईल. इंधन दरात कपात झाल्यास राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
याआधी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात केली होती. तसेच अनेक राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारही इंधन दरकपातीचा निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.