सरकारविरोधी अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी भारत सरकारची ट्वीटरला धमकी, जॅक डॉर्सी यांचा आरोप
X
Twitter CEO Jack Dorsey : ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी ब्रेकिंग पॉईंटला दिलेल्या मुलाखतीत लोकशाहीवर बोलताना भारत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी मे 2022 मध्ये ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. या घटनेला वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र आता जॅक डॉर्सी यांनी जगातील सगळयात मोठी लोकशाही या विषयावर @esaagar आणि @krystalball यांना मुलाखत दिली. यावेळी ट्विटर चालवताना सरकारचे प्रेशर आणि इतर कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर जॅक डॉर्सी म्हणाले, यामध्ये आपण भारताचे उदाहरण घेऊ. जेव्हा भारतात शेतकरी आंदोलन (Farmer Protest) सुरु होते. त्यावेळी अनेक ट्विटर हँडल्स ब्लॉक करण्याची शिफारस सरकारने केली होती. ज्यामध्ये सरकारच्या निर्णयावर टीका करणाऱ्या अनेक पत्रकारांचा समावेश होता. त्यावेळी सरकारने सांगितले की, जर हे अकाऊंट ब्लॉक केले नाही तर ट्विटर बंद करू (Shut Down Twitter) किंवा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या घरावर छापे मारू, अशा प्रकारची ही भारताची लोकशाही असल्याची टीका जॅक डॉर्सी यांनी भारत सरकारवर केली.
यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यामध्ये युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास यांनी म्हटले आहे की, लोकशाहीही जननी. तसेच पुढे जॅक डॉर्सीचं वक्तव्य कोट केले आहे.
काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी म्हटले आहे की, ट्विटरच्या माजी सीईओने भारतातील हुकूमशाहीचा चेहराच जगासमोर आणला. विरोधी पक्षांचा आणि पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी ट्वीटरवर दबाव टाकण्यात आला. त्यांच्या कार्यालयांवर आणि घरावर छापे टाकण्याची धमकी देण्यात आली. परिस्थिती गंभीर आहे. या अडचणींच्या वेळी काँग्रेस निष्पक्ष पत्रकारांच्या मागे उभी आहे. तुमचा आवाज क्षीण होऊ देऊ नका. तुमचा आवाज अमूल्य आहे, असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी सरकारवर निशाणा साधला.
जॅक डॉर्सी यांच्या आरोपानंतर भारत सरकारचे माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच जॅक डॉर्सी हे खोटं बोलत असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.