राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक? ; तब्बल 13 तास सुरू होती चौकशी
X
मुंबई // 100 कोटी वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक झाल्याचे वृत्त समोर येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जवळपास 13 तासांपासून ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू होती अशी सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर काल ( दि. 1 नोव्हेंबरला) ईडीसमोर हजर राहिले. ईडीकडून त्यांची जवळपास 13 तास मॅरेथॉन चौकशी सुरू होती.
काल सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या दरम्यान देशमुख ईडी कार्यालयात गेले होते. त्यानंतर त्यांची चौकशी झाली आणि वेगवेगळ्या कलमांनुसार त्यांना अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंगच्या अनुषंगानं ही सर्व कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे. आज सकाळी त्यांना ईडीच्या कोर्टामध्ये हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची सकाळी वैद्यकीय चाचणी होणार असून, त्यानंतर ईडीच्या विशेष न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. याआधी अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान अनिल देशमुख चौकशीत ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हेदेखील ईडी कार्यालयात गेले होते. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी 7.30 सुमारास मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. त्यानंतर देशमुख यांची सखोल चौकशी करण्यात आली. या आधी 5 वेळा देशमुख यांना समन्स बजावण्यात आला होता. पण तरीसुद्धा ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. प्रकृती आणि वयाची कारणे देत अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास टाळाटाळ केल्याचं सांगितलं जात होतं.दरम्यान काल देशमुख यांच्या अटकेनंतर राज्याच्या राजकारण खळबळ उडाली असून , राजकीय वातावरण तापले आहे.