काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन
X
रायगड : रायगड जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी देणारे आणि अलिबाग-उरण मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे गुरूवारी निधन झाले. वाढदिवसालाच त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ते आजारी होते. गुरूवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मधुकर ठाकूर यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी दोन वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मधुकर ठाकूर हे काँग्रेसचे विचारांचे सच्चे पाईक होते, आयुष्यभर त्यांनी काँग्रेस विचाराची साथ सोडली नाही. त्यांच्या निधनाने काँग्रेसचा एक समर्पक लोकसेवक हरपला, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आदरांजली वाहिली आहे.
रायगड जिल्ह्यातील झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद आणि मग 2004 ते 2009 या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी नेतृत्व केले. मधुकर ठाकूर यांनी 2004 मध्ये शेकापच्या तत्कालीन राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता. अलिबागमध्ये तब्बल 32 वर्षांनी शेकापचा पराभव करण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या मधुकर ठाकूर यांनी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपदही भूषवले.