जातेगाव येथील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
X
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात असलेल्या जातेगाव येथे मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सातत्याने येथील ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होतं असल्याने नागरिकांनी या भागात पिंजरा लावण्याची मागणी वन विभागाकडे केली होती. या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे यासाठी वनविभागाला अनेकदा पत्रव्यवहार केल्यानंतर 3 दिवसांपूर्वी जातेगाव येथे पिंजरा लावण्यात आला होता. होता.अखेर आज त्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सातत्याने या परिसरात बिबट्याचे दर्शन घडत असल्याने रात्रीच्या वेळी शेतात जातांना येथील नागरिकांना भीती वाटत होती. त्यामुळे शेतीच्या कामांवर देखील परिणाम होत होता. केवळ रात्रीच नाही तर या परिसरात दिवसा देखील अनेकांना बिबट्याने दर्शन दिले आहे.
दरम्यान नागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने पिंजरा लावत या पिंजऱ्यात भक्ष ठेवल्यामुळे बिबट्याला जेरबंद झाला आहे.
दरम्यान एका बिबट्याला जेरबंद करण्यात जरी यश आले असले तरी या भागात आणखी बिबटे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या भागात पिंजरा तसाच ठेवण्याची विनंती ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
आज ज्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले असून , या भागात भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात बिबटया येत असल्याने तसेच या भागात बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतीचा भाग असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. सोबतच बिबट्या निदर्शनास पडल्यास तातडीने वनविभागाला त्याची माहिती देण्याचे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.