बजेट 2021 : बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटी
X
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांमुळे बाजार समित्यांची यंत्रणा संपेल अशी भीती शेतकऱ्यांना असताना राज्य सरकारने राज्यातील बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी तब्बल २ हजार कोटींची तरतूद केली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी काही घोषणाही केल्या.
३ लाखांपर्यंतचे पीककर्ज नियमितपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ० टक्के दराने कर्जपुरवठा करण्याची घोषणाही त्यांनी केली. तर ४ कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून डिसेंबर २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. तर जलसंपदा विभागासाठी १२ हजार ९१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १२ धरणांच्या बळकटीकरणासाठी ६२४ कोटींची तरतूद केली गेली आहे.