Republic Day : आव्हाने परतवून लावण्यासाठी आपण वज्रमुठ करूया, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री आजारी होते. त्यामुळे मुख्यमंत्री ध्वजारोहणाला उपस्थित राहणार का अशी चर्चा होती. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण संपन्न झाले. तर मुख्यमंत्र्यांनी जनतेला शुभेच्छा देतांना येणाऱ्या आव्हानांविरोधात वज्रमुठ करूया, असे आवाहन केले आहे.
X
मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे विधीमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्याबरोबरच मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका विरोधी पक्षाकडून केली जात होती. तर त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहतील का अशी चर्चा सुरू होती. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहन केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ट्वीटर संदेशाच्या माध्यमातून जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यात असीम त्याग, समर्पण आणि अनेकांचे हौतात्म्य यातून साकारलेले भारतीय प्रजासत्ताक बलशाली करूया. त्यासोबत येणारी आव्हाने परतवून लावण्यासाठी आपण वज्रमुठ करूया, असे आवाहन जनतेला केले आहे. तर या ट्वीटर संदेशात त्यांनी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिस पथकाने राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट करून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.