#Omicron : चिंता वाढली, Omicronचा महाराष्ट्रात पहिला पेशंट आढळला
X
कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमधून जरा कुठे दिलासा मिळत असताना आता पुन्हा चिंता वाढली आहे. Omicron व्हेरिअन्टने महाराष्ट्रातही आता शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. ओमायक्रॉनचा राज्यातील पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळला आहे. या पेशंटवर गेल्या काही दिवसांपासून लक्ष ठेवण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्याचे नमुने जीनोम चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या चाचणीचा अहवाल शनिवारी आला आहे. हा पेशंट ३३ वर्षांचा आहे. २४ नोव्हेंबरला तो दक्षिण अफ्रिकेतून कल्याण-डोंबिवलीमध्ये आला होता.
चिंता वाढली पण दिलासा देणारी माहिती आली समोर
कल्याण-डोंबिवलीमधील या तरुणाने कोणतीही लस घेतलेली नव्हती. पण दिलासादायक बाब म्हणजे त्याच्या संपर्कात आलेले सर्व जण निगेटिव्ह आले आहेत. या तरुणाचा आजार सौम्य स्वरूपाचा आहे. तसेच सध्या कल्याण-डोंबिवली कोव्हिड सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दोन दिवसांपूर्वीच शेजारच्या कर्नाटकमध्ये ओमीक्रॉनचे दोन आढळले होते. ते देशातील पहिले दोन पेशंट होते. त्यातील एक पेशंट दक्षिण आफ्रिकेत परतला आहे. पण त्याने कोरोना पॉझिटिव्ह असतानाही निगेटिव्ह रिपोर्ट मिळवून तो मायदेशी निघून गेला.