अर्णब यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल…
X
अलिबाग येथील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी आज दि. 4 नोव्हेंबर, रोजी सकाळी पत्रकार अर्णव गोस्वामींना मुंबईतून अटक केली. त्यानंतर त्यांना सकाळी साडेअकराच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दीड तास चौकशी केल्यानंतर गोस्वामी यांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अर्णव गोस्वामी याने न्यायाधीशांसमोर पोलिसांवर मारहाणीचे आरोप केले. मात्र वैद्यकीय तपासणीत सदर आरोप खोटे असल्याचे उघड झाल्याने हे आरोप न्यायालयाने फेटाळून लावले. त्यानंतर उशिरापर्यंत चाललेल्या सुनावणीत दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तीवादानंतर न्यायालयाने अर्णव गोस्वामीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होईल. सुनावणी दरम्यान अर्णव गोस्वामी यांच्या पत्नीने मोबाईलवर चित्रीकरण केल्याने कोर्टाचा अवमान केला. तसेच भाजपाने देखील या कारवाईचा निषेध व्यक्त करीत सरकारविरोधी घोषणाबाजी केल्याने या प्रकरणाला नाटयमय वळण लागले.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी बुधवारी (4 नोव्हेंबर) सकाळी पत्रकार अर्णव गोस्वामींना मुंबईतून अटक केली. त्यानंतर त्यांना सकाळी साडेअकराच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दीड तास कसून चौकशी केल्यानंतर गोस्वामी यांना मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अर्णव गोस्वामी यांनी न्यायाधीशांसमोर पोलिसांवर आरोप केले. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचे सांगत, लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे. मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोपही अर्णव गोस्वामी यांनी केले आहेत. पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करावी, असे आदेश दिले.
अर्णव गोस्वामीचे वकीलपत्र अॅड गौरव पारकर यांनी घेतले. दुसरा आरोपी नितेश सारडा यास अटक करण्यात आली असून अॅड सुशील पाटील यांनी सारडा चे वकील पत्र स्वीकारले तर सहायक सरकारी वकील ॲड रुपेश महाकाळ यांनी सरकारची बाजू मांडली.सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या कुटूंबियांविरोधात मुंबईतील एन एम जोशी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड पोलिसांच्या कार्यवाही नंतर मुंबई पोलिस अर्णव गोस्वामीना या प्रकरणात ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
अर्णव गोस्वामी यांच्यावरील खटल्याची सुनावणी सुरु असताना त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या पत्नीने आपल्याकडील मोबाईलवर चित्रिकरण करण्यास सुरुवात केली. यावर आक्षेप घेत त्यांच्याकडील मोबाईल काढून घेण्यात आला. थोडया वेळाने त्यांनी दिलगीरी व्यक्त केल्याने मोबाईल परत देण्यात आला. मात्र पुन्हा त्यांनी चित्रिकरण करण्यास सुरुवात केल्याने त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले जात आहेत.
या प्रकरणाच्या फेरतपासात काही नवीन मुद्दे समोर आले आहेत. त्यांचा तपास करायचा आहे. मागील तपासात काही त्रुटी राहून गेल्या आहेत. साक्षीदारांना तपासण्यासाठी आरोपींची गरज आहे. या प्रकरणातील कागदपत्रं ताब्यात घेऊन तपासायची आहेत त्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे अशी मागणी सरकारी वकिलांच्या वतीने करण्यात आली. मात्र आरोपींच्या वकीलांनी हा युक्तीवाद खोडून काढला.
दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी तीनही आरोपींची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली आणि १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 'आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे. पोलीस कोठडीसाठी योग्य संयुक्तिक आणि सबळ कारण देता आली नाही. अ समरी रिपोर्ट मान्य झाल्यावर पुन्हा केसचा फेरतपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही, अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू यां घटनेशी आरोपींचा थेट संबंध प्रस्थापित व्हायला हवा, तो पोलिसांना करता आला नाही,' असं निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले. तिनही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.