नितेश राणेंना जामीन मिळणार का? मंगळवारी कोर्टात फैसला
X
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नितेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेचे संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अटक केलेल्या एका आरोपीने नितेश राणे यांचे नाव घेतल्याने भाजपचे आमदार असलेल्या नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते याला पोलिसांनी दिल्लीमधून अटक केली आहे. याप्रकरणी नितेश राणे यांची तीनवेळा चौकशी करण्यात आली होती. पण विधिमंडळ अधिवेशनात संतोष परब प्रकरणावर चर्चा झाल्याने पोलिस आता एक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी राणे यांच्या सिंधुदुर्गातील घरी जाऊन चौकशी केली, पण सध्या नितेश राणे त्यांच्या घरी नव्हते.
दरम्यान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्या अटकेची मागणी केली. तसेच सुनिल प्रभू यांनी सभागृहात नितेश राणे यांचे नाव न घेता कारवाईची मागणी केली. यावर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रकऱणात आरोपी कुणीही असला तरी सोडणार नाही, तसेच कुणी नॉट रिचेबल असेल तर सोडणार नाही, असा इशारा यावेळी दिला.