बंगळुरूतील त्या समाजकंटकांना शोधा आणि कठोर कारवाई करा- अजित पवार
X
मुंबई : काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा धक्कादायक कर्नाटकातून प्रकार समोर आला होता. कर्नाटकाली हा व्हिडिओ समोर आला आणि कोल्हापूर, बेळगावात शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर त्यांनी त्या भागातील कनडिगांची दुकाने बंद केली, मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरल्याने कर्नाटक पोलिसांनी लाठीमारही केला. त्याचे पडसाद आता कर्नाटकातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागलेत. राज्यातले नेतेही या घटनेवरून आक्रमक झालेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले सोबतच त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून या घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला. कर्नाटक सरकार आणि केंद्रसरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
दरम्यान याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केल्याचे समजले. हा प्रकार अत्यंत संताप आणणारा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी पाटील यांनी केली आहे.