Home > News Update > अखेर सुधागडमध्ये नरेगा अंतर्गत कामाची सुरुवात

अखेर सुधागडमध्ये नरेगा अंतर्गत कामाची सुरुवात

अखेर सुधागडमध्ये नरेगा अंतर्गत कामाची सुरुवात
X

वन व्यवस्थापणातून शाश्वत रोजगारची शाश्वत हमी !

लोक समुदायाच्या सक्रिय सहभागातून वनसंरक्षण व शाश्वत वन व्यवस्थापनाचे ध्येय गाठता येणे शक्य आहे. त्यासाठी आदिवासी लोकसमुदायांना गावालगतच्या वन क्षेत्रात वनव्यवस्थापनाच्या अनुषंगाने आवश्यक कामाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन अलिबागचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले. ग्रुप ग्रामपंचायत चिवे अंतर्गत येणाऱ्या सुधागड तालुक्यातील मौजे मजरे जांभूळपाडा या गावला भेट दिली होती.

या गावाला २०१९ साली कंपार्टमेंट नंबर ६५१ मधे एकूण १३९.५ एकर इतक्या वन क्षेत्रावर वनहक्क कायदा २००६ चे कलम ३(१) अंतर्गत सामूहिक वनहक्क अधिकार मान्यता प्राप्त झाले आहेत. या सामूहिक वनहक्क क्षेत्राच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी सबंधित सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिति, मजरे जांभूळपाडा व वन विभाग, सुधागड पाली यांनी संयुक्त रित्या सूक्ष्म नियोजन केले होते. या सूक्ष्म नियोजनाची अंमलबजावणीं करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करण्यात आली होती. अलिबागचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी या गावला भेट देऊन स्थानिक आदिम आदिवासी लोक समुदायाच्या स्थलांतराची व वन व्यवस्थापनासाठी तयार केलेल्या सूक्ष्म नियोजनाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला होता. प्रस्तावित कामे ही वनीकरणाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरणार असल्याने व स्थानिक आदिवासी लोक समुदायातील नागरिकांचे स्थलांतर कायमचे थांबवण्यासाठी प्रस्तावित सर्व कामांना तत्काळ तांत्रिक मंजुरी देण्याचे निर्देश सबंधित वन अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना दिले होते. आता या कामांना मंजूरी मिळाली आहे.

नरेगा अंतर्गत ही होणार कामे

वन तलाव बांधणे

वृक्ष लागवड करणे

अनघड दगडी नालाबांध बांधणे

रोपवाटिका उभारणे



यासोबतच २४७९३९२ इतक्या निधीच्या कामांना तंत्रिक तसेच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत ८२४२ इतक्या मनुष्य दिवसांचा रोजागर निर्माण होणार आहे. पैकी मंजूर वन तलावासाठी ५२८९०८ लक्ष इतका निधी मंजूर झाला असून या कामांतर्गत १९७६ इतके मनुष्य दिवस रोजगार मिळणार आहे. दिवसांचे काम दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ पासुन सुरू झाले असून या कामांतर्गत मौजे मजरे जांभूळपाडा येथील आदिम आदिवासी लोकसमुदायांना शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

रोजगार हमी योजनेतून मिळणारे काम हे आम्हाला रोजगार उपलब्ध करून देणार तर आहेच शिवाय रोजगारा बरोबरच आमच्या सामुहिक वनहक्क वन क्षेत्राचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन आम्ही सर्व मजरे जांभूळपाडा आदिवासी वाडीचे नागरिक मिळून करणार आहोत असे मत मजरे जांभूळपाडा सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे सचिव सुभाष जाधव, वन तलाव उद्घाटनावेळी केले.

रोजगारासाठीचा स्थलांतराचा फास आमच्या गळ्यातून निघाला आहे असे म्हणायला हरकत नाही. आम्हाला आता गाव सोडून बाहेर जावे लागणार नाही. गावातच रोजगार मिळाल्यामुळे आमची मुलंबाळ शिकू शकतील याचा आम्हाला आनंद आहे. असे मत मजरे जांभूळपाडा सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनंता वाघमारे यांनी व्यक्त केले.

रोजगार हमी योजने अंतर्गत कामे कशाला करता ते तुम्हाला परवडणार नाही, ही कामे कधी मंजूर होणार नाहीत, या सगळ्या भुलथपा आहेत असे सांगून आम्हा आमच्या गावातून धंद्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न अनेक ठेकेदारांनी केला. मात्र आम्ही . प्रशासनावर विश्वास ठेवला त्याचा फायदा झाल्याचे मत मजरे जांभूळपाडा सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीच्या सदस्य भारती पवार यांनी व्यक्त केले.


वनांचे रक्षण करणे हे वनांवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून असणाऱ्या आदिम आदिवासी लोक समुदायाची सांस्कृतिक परंपरा आहे. पिढ्या दर पिढ्या या समुदायाने वनांचे रक्षण केले आहे. कालपर्यंत स्थानिक जागेवर रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नसल्यामुळे या समुदायाला गरजेपोटी स्थलांतर करावे लागत होते. स्थलांतरात उत्पन्नाच्या ऐवजी कर्जबाजारीपणाच वाट्याला येत होता. मात्र रोजगार हमी योजनेतून वन संरक्षण व व्यवस्थापनाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. स्थलांतराची ही शृंखला संपण्याची ही निर्णायक वेळ असल्याचे मत वातावरण फाऊंडेशनचे कार्यक्रम व अभियान प्रमुख राहुल सावंत यांनी मांडले.

सावंत पुढे म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पहिल्यांदाच सामूहिक वनहक्क संवर्धन व व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. परंतु तयार केलेला आराखडा केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेची होती. ती आज या कामाच्या माध्यमातून सुरू झाली.

अनुसूचित क्षेत्र लागू नसलेल्या (Non PESA Area) सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त वन क्षेत्रात नरेगा अंतर्गत काम सुरू होणारे मजरे जांभूळपाडा हे महाराष्ट्रातील कदाचित पहिले गाव असावे . हे विशेष करून लक्षात घेण्यासारखे आहे. असेही सावंत यावेळी म्हणाले.

वन विभाग तसेच महसूल विभागाने आदिवासी लोक समुदायाच्या एकजुटीवर विश्वास दाखवला आहे त्याबद्दल जिल्हाधिकारी, रायगड, उपवनसंरक्षक, अलिबाग, उपजिल्हाधिकारी, नरेगा, रायगड, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण तहसीलदार, सुधागड पाली, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुधागड पाली, वनपाल, चिवे, वनरक्षक, चिवे यांचे आभार वातावरण फाऊंडेशनचे CEO तसेच संस्थापक भगवान केसभट यांनी मानले.

यावेळी सुधागड तालुक्याचे वन प्रिकहेटर अधिकारी दादासाहेब कुकडे, रोहिदास सखेकर, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चिवे, मनोज साळवी, वनपाल, चिवे, एल. संकेत गायकवाड,विनोद चव्हाण, वनरक्षक, चिवे, राहुल सावंत, कार्यक्रम व अभियान प्रमुख, वातावरण फाऊंडेशन,अंकुश लोणकर, शिवाजी हिरडे, रमेश साखरे, तालुका समन्वयक, वातावरण फाऊंडेशन व सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा चे सदस्य यावेळी उपस्थित होते.

Updated : 7 Oct 2024 6:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top