तुम्ही साडेतीन मोजत बसा, संजय राऊत यांचा भाजपला इशारा
पीएमसी घोटाळा, खंडणीसह अनेक दाबलेली प्रकरणं आता उघड होत असून, बाप-बेटे निर्दोष असतील तर जामीनासाठी धावपळ का करताहेत.. लिहून ठेवा बाप-बेटे निश्चित जेलमधे जातील असं शिवसेना खा. संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
X
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्यापूर्वी महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना पुन्हा रंगला आहे. किरीट सोमय्या सातत्याने शिवसेनेला लक्ष्य करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. त्याला उत्तर देताना संजय राऊतांनी देखील थेट शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर प्रतिहल्ला चढवला होता. आता पुन्हा आर्यन खान प्रकरणात एनसीबीच्या एसआयटीनं क्लीनचिट दिल्यानंतर संजय राऊतांनी भाजपावर आणि किरीट सोमय्यांवर हल्ला चढवला आहे.
"भाजप नेत्यांची पीएमसी घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणं आजपर्यंत दाबून ठेवली होती. हळूहळू सगळंआता समोर येऊ लागले आहेत. सगळ्यांना समजेल. सोमय्या निर्दोष आहेत, तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत? जेव्हापासून मी सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, हे बाप-बेटे दारोदार या कोर्टातून त्या कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव करत आहेत. त्याची गरज तुम्हाला का पडतेय? यातच सगळं स्पष्ट होतंय. मी जे साडेतीन म्हणालो, ते तुम्ही मोजत राहा", असही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
त्या साडेतीन लोकांची नावं जाहीर केली, तर ते अटकपूर्व जामिनासाठी जातात. जसजशी त्यांना अटक होईल, तसतसं तुम्हाला समजेल. पण माझे शब्द लिहून ठेवा, हे बाप-बेटे आणि इतरही काही लोक, जे मोठमोठ्या गप्पा करतात, ते सगळे तुरुंगात जाणार आहेत", असं राऊत यांनी ठामपणे सांगितलं.
आर्यन खान क्लीनचिट प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, "आर्यन खान प्रकरणात एसआयटीनं सांगितलं की त्या मुलाकडे ड्रग्ज सापडलंच नाही. असा बनाव आमच्या प्रत्येकाच्या बाबतीत केला जातोय. हे उघड होईल. आता मी समोर आलोय. आत्तापर्यंत मी यात पडलो नव्हतो. आता मी सगळ्यांचे मुखवटे उतरवून त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझे शब्द लिहून ठेवा", असं राऊत म्हणाले.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर बोलताना राऊत म्हणाले, "भारत सरकार सक्षम आहे, पण सरकार चालवणारे भाजपाचे नेते निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यांना उशिरा जाग आल्यामुळे आमच्या मुलांना अपमानित व्हावं लागत आहे. पोलंड, युक्रेन, रोमेनियाच्या सीमेवर लाथाबुक्क्यांनी मारलं जातंय. त्यांना उपाशी ठेवलं जातंय. एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. आणि तुम्ही राजकारण करत आहात. हे आम्ही करतोय वगैरे. हे तुमचं कर्तव्यच आहे. मनमोहन सिंग यांनीही कुवैत युद्धाच्या वेळी १६ हजार भारतीयांची सुटका केली होती. त्यात गाजावाजा केला नव्हता", असं राऊतांनी स्पष्ट केले.
विधीमंडळ आधिवेशनाच्या तोंडावर महाविकास आघाडी- भाजप वाद पुन्हा एकदा पेटला आहे.