Home > News Update > Lockdownमुळे फॅशन डिझायनर बनला चोर

Lockdownमुळे फॅशन डिझायनर बनला चोर

देशात कोरोनामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली. त्यातून सावरत काहींना आपला छोटासा व्यवसाय उभा केला. तर काही गैरमार्गाला लागले. अशाच प्रकारे लॉकडाऊनमुळे काही काम न राहिल्याने फॅशन डिझायनर चोर बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Lockdownमुळे फॅशन डिझायनर बनला चोर
X

लॉकडाऊनमुळे अनेकांची नोकरी गेली तर कायम निर्बंधांच्या सावटाखाली बाजारपेठ दबली गेली. त्यामुळे अनेक व्यवसायिकांच्या व्यवसायावर गदा आली. त्याच प्रकारे डोंबिवलीतील युसूफ खान या फॅशन डिझायनरने दुचाकींची चोरी Bike Robbery ) करत त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरटीओला फसवून ओएलएक्सवर (OLX) विकल्याचे उघड झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

युसूफ खान या फॅशन डिझायनरला लॉकडाऊनमुळे काम न मिळाल्याने त्याने दुचाकी चोरी करण्यास सुरूवात केली. त्यात त्याने चार दुचाकी ओएलएक्सच्या माध्यमातून आरटीओला फसवून बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून विकल्या. मात्र दुचाकीचे ई-चलान कापल्याने त्याचा मेसेज आल्यामुळे व्यक्तीने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी फॅशन डिझायनर असलेल्या युसूफ खान नावाच्या चोराच्या मुसक्या आवळल्या.

लॉकडाऊननंतर दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे डीसीपी संजय गुंजाळ आणि एसीपी जे डी मोरे यांनी विशेष तपास पथके स्थापन केले आहेत. त्यातील मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक दुचाकी चोरीचा तपास करीत होते. दरम्यान एका चोरी झालेल्या दुचाकीचे ईचलान कापले गेले. त्याचा मेसेज ज्या व्यक्तीची दुचाकी होती त्या व्यक्तीला गेला. त्यानंतर त्या व्यक्तीने मानपाडा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे त्या दिशेने फिरवली. त्यानुसार ती दुचाकी पुण्याचा एक व्यक्ती वापरत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्या व्यक्तीने रीतसर कादपत्रे तयार करून ओएलएक्सवरून दुचाकी विकत घेतल्याचे सांगितले. तर दुचाकी समीर शेख नावाच्या व्यक्तीने विकल्याचे तपासात उघड झाले. मात्र समीर शेख नावाची व्यक्ती अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवत सापळा रचून युसूफ खानला अटक केली.

त्यानंतर युसूफ खान हा डोंबिवलीतील पलावा सिटीत राहणारा फॅशन डिझायनर होता. मात्र लॉकडाऊनमध्ये काम न मिळाल्याने त्याने दुचाकीचे खोटे कागदपत्र तयार करून दुचाकी चोरीचा गैरप्रकार करण्यास सुरूवात केल्याचे पोलिसांना सांगितले. तर युसूफ खान खोटे कागदपत्र दाखवून आरटीओचीही फसवणूक करत होता, अशी माहिती तपासात समोर आली. तर त्याने आतापर्यंत चार दुचाकी चोरल्याची माहिती दिली आहे. मात्र मानपाडा पोलिस अजून किती दुचाकी चोरी झाल्या याचा तपास करत आहेत.

Updated : 13 Jan 2022 3:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top