#Lakhimpur : केंद्रीय मंत्री अजय मिश्रांना हटवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, उ. भारतात रेल रोको
X
लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. पण आता अजय मिश्रा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकावे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी रेल रोको आंदोलन केले. उ. भारतात आणि विशेषत: पंजाब आणि हरयाणामध्ये जवळपास १३० ठिकाणी रेल रोको करण्यात आला. उ. रेल्वेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार या आंदोलनामुळे सकाळपासून ५० गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. पंजाबमधील फिरोजपूर आणि हरयाणामधील अंबाला विभागात सर्वाधिक आंदोलने झाली.
या आंदोलनामुळे दोन ट्रेन रद्द कराव्या लागल्या. तर सुमारे १२ गाड्यांचा प्रवास कमी करण्यात आला असून एका गाडीचा मार्ग बदलण्यात आला. दरम्यान लखीमपूर खेरी प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता.