#FarmersProtest : शेतकरी आंदोलनाचे 4 महिने, भारत बंदची घोषणा
X
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज 4 महिने पूर्ण होत आहेत. पण अजूनही सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांनी दिल्ली - गाजीपूर बॉर्डरवर रास्ता रोको केला आहे. तर दुसरीकडे दिल्ली-अमृतसर रेल्वे मार्गही आंदोलकांना रोखून धरला. या बंदचा सगळ्यात जास्त परिणाम दिल्लीच्या आसपासचा परिसर, पंजाब, हरयाणा या राज्यांमध्ये पहायला मिळतो आहे. हरयाणामध्ये तर शेतकऱ्यांनी बाजारात भाज्या विक्रीही बंद ठेवली आहे, त्यामुळे अनेक बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत.
पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी 32 ठिकाणी आंदोलन सुरू केले, त्यामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. शताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्याची घोषणा रेल्वेतर्फे करण्यात आली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. पण 26 जानेवारी रोजी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सरकार आणि शेतकऱ्यांमधील चर्चा थांबली आहे, सरकारने 18 महिने म्हणजेच दीड वर्ष कृषी कायदे स्थगित करण्याची तयारी दाखवली आहे. पण शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळतत कायदे रद्द करण्याची मागणी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.