'हवं तर नुकसान भरपाईची रक्कम तुमच्याकडे ठेवा पण आम्हाला नदीचे खोलीकरण करून द्या'
X
बुलडाणा : बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणातून ओव्हरफ्लो होणारे पाणी पैनगंगा नदीपत्रात जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात शिरते. त्यामुळे शेतीपिकांचे व शेत जमिनीचे मोठे नुकसान होते. त्यासाठी पैनगंगा नदीपत्रातील रस्ता खोलीकरण करावे व आम्हाला पुराच्या धोक्यापासून वाचवावे. हवं तर आमचही नुकसान भरपाईची रक्कम तुमच्याकडे ठेवा पण नदी खोलीकरण करा तसेच येळगाव धरणाला सांडवा काढा व पाच गेट मानव निर्मित करा या मागण्यांसाठी गावकऱ्यांनी महिलांसह रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
येळगाव धरणासाठी आमच्या जमिनी गेल्या आहेत. ज्या जमिनीचा वापर धरणासाठी झाला नाही त्या जमिनी आम्ही ४०-५० वर्षांपासून वहीती करतो. ज्या उद्देशाने त्या जमिनी संपादित केल्या आहेत त्या उद्देशासाठी त्या जमिनीचा उपयोग झाला नसेल तर त्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्या असा कायदा आहे. पण त्या जमिनीवर पर्यटन स्थळ उभे करण्याचा घाट बुलडाणा नगरपालिकेने घातला आहे. आमच्याकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तेवढीच जमीन आहे. जर ती जमीन गेली तर आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल. पर्यटन स्थळ झाले नाही म्हणून कोणी आत्महत्या करणार नाही पण जमिनी गेल्या तर आम्हाला आत्महत्या कराव्या लागतील अशा संतप्त भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.