Home > News Update > दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात मोर्चा

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात मोर्चा

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशस्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी 3 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना व कामगार संघटनानी राज्यभर आंदोलन करण्याची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या राज्य कौन्सिलने दिली होती. समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत अकोले, जिल्हा अहमदनगर येथे समविचारी शेतकरी संघटनांनी भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात मोर्चा
X

तहसील कार्यालयात शेतीमाल ओतून यावेळी शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. तहसील कार्यालयात ओतलेला शेतीमाल तहसीलदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पंतप्रधानांना शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम न देताच शेतीमाल हवा आहे. तीन कायदे करून व शेतकरी विरोधी धोरणे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना हमी भाव नाकारून एकप्रकारे घामाचे दामच नाकारत आहेत. आमची लूटमार व्हावी अशी धोरणे घेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर लुटता कशाला फुकटच घ्या म्हणत अकोल्याच्या शेतकऱ्यांनी या मोर्चाद्वारे पंतप्रधान मोदींना शेतीमाल पाठविला आहे.


दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या दडपशाहीचा यावेळी झालेल्या सभेत शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला. दिल्ली येथील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीद आंदोलकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या झेंड्याखाली निघालेल्या या मोर्चात किसान सभा,राष्ट्रसेवा दल, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, छात्र भारती, विद्रोही विद्यार्थी संघटना, संभाजी ब्रिगेड, माकप, भाकप, सिटू कामगार संघटना, रिपब्लिकन पार्टी यासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, आ. डॉ. किरण लहामटे, कारभारी उगले, विनय सावंत, सदाशिव साबळे, महेश नवले, डॉ. संदीप कडलग, नामदेव भांगरे, सुरेश नवले, सोमनाथ नवले, भानुदास तिकांडे, एकनाथ मेंगाळ, राजू कुमकर, विनोद हांडे, शांताराम संगारे, स्वप्निल धांडे आदींची यावेळी भाषणे झाली. शेतकरी आंदोलन यशस्वी करण्यासाठी अखंड प्रयत्न करण्याचा संकल्प आंदोलकांनी व्यक्त केला.



Updated : 3 Dec 2020 7:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top