किसान सभेचे चलो दिल्ली
X
दिल्लीत गेल्या सव्वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. नाशिक येथून किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या या वाहन मोर्चात महाराष्ट्रभरातील 21 जिल्ह्यांमधून हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. काल राज्यभरातील हे शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानातून पुढे निघाले आहेत.
शेतकऱ्यांना किमान आधार भावाचे संरक्षण मिळावे व केंद्रीय स्तरावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी यासाठी राज्यसभेत खा. के. के. रागेश यांनी खाजगी विधेयके मांडून देशभरातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संसदेत रान उठविले होते. आताच्या तिन्ही शेतकरीविरोधी आणि जनताविरोधी कायद्यांना राज्यसभेत त्यांनी कसून विरोध केला होता. दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून निघणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी के. के. रागेश उद्या नाशिक येथे येत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून गोल्फ क्लब मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेनंतर हा वाहन मोर्चा दिल्लीकडे निघाला आहे. शेकडो वाहने असलेला हा वाहन मोर्चा मुंबई-आग्रा महामार्गाने ओझर, पिंपळगाव बसवंत, शिरवाडे (वणी) मार्गे सायंकाळी ५-३० वाजता चांदवड येथे मुक्कामी पोहचेल. दुसऱ्या दिवशी २२ डिसेंबर रोजी सकाळी ८-०० वा चांदवड येथून वाहन मोर्चा पुन्हा सुरू होऊन उमराणे, मालेगांव, धुळे, शिरपूर मार्गे मध्य प्रदेशात मार्गस्थ होईल. या सर्व ठिकाणी जनतेतर्फे त्याचे जंगी स्वागत होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान मार्गे 24 डिसेंबर रोजी तो दिल्ली येथे पोहचेल.
शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे या मागण्याबरोबरच शेतकऱ्यांना आधार भावाचे कायदेशीर संरक्षण देणारा कायदा करावा व सरकारने आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्याची सक्षम व्यवस्था उभी करून अन्नदात्याला घामाचे रास्त दाम व भुकेलेल्याला रास्त दरात अन्न देण्याची कायदेशीर व्यवस्था उभी करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा वाहन मोर्चा निघाला आहे.