#FatherDay चंदनासारख्या झिजलेल्या बापासाठी रांगडा शेतकरी नेता रविकांत तुपकर झाले भावुक
X
मी शेतकर्याचा मुलगा म्हणजे शेतकरी होणार हे बालपणापासूनच माझ्या मनावर बिंबवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. माझा बाप शेतकरी असल्याचा मला कधीच कमीपणा वाटला नाही. पण त्याच्या आणि गावाकडील इतर शेतकऱ्यांच्या दुःखाचं कारण मात्र मला शोधायचं होतं, त्यासाठी लढायचं होतं आणि ते मी करतोय. या सगळ्या विचारांचं मूळच मुळात माझे तीर्थरुप आणि त्यांचा शेतकरी पेशा असल्याने माझी पूर्ण जडणघडण, प्रवासच त्यांच्या प्रेरणेने सुरू आहे, यात शंका नाही.
अपार कष्ट आणि संघर्ष आमच्या वडिलांनी केला मात्र जगातल्या कुठल्याही बापाप्रमाणेच आपल्या लेकरांना अर्थात आम्हाला त्याची झळ कधी पोहोचू दिली नाही. आमच्या शिक्षणाच्या बाबतीत तडजोड केली नाही की आमच्या निर्णयांवर आक्षेप घेतले नाही. त्यांनी केवळ आमच्यावर विश्वास दाखवला आणि तोच आमच्या वाटचालीचं इंधन आहे.
आज माझ्या मुलांसाठी आदर्श नाही तरी एक चांगला बाप बनण्याच्या सतत प्रयत्नात आहे. समाजकारणाच्या रगाड्यात त्यांना फारसा वेळ देता येत नाही, याची खंत आहे. मात्र माझ्या प्रत्येक कृतीतून, विचारातून, आचारातून माझी मुलं शिकत आहेत, आपला बाप समजून घेत आहेत, याची जाणीव आहे. आमच्यासाठी चंदनासारख्या झिजलेल्या आमच्या तीर्थरूपांना तसेच जगातील सगळ्या बापांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!