Home > News Update > प्रसिद्ध कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज यांचे निधन

प्रसिद्ध कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज यांचे निधन

पद्मविभुषण पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्राला पिता मानणाऱ्या पं. ब्रिजमोहन मिश्रा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

प्रसिद्ध कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज यांचे निधन
X

पद्मविभुषण पुरस्कार प्राप्त पंडीत ब्रिजमोहन मिश्रा उर्फ पंडीत बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनऊ येथे झाला. तर त्यांना संगीताची परंपरा त्यांच्या घराण्यातूनच मिळाली. ते नर्तकासोबतच शास्रीय गायकही होते. तर त्यांनी कथ्थकसाठी कलाश्रम नावाची संस्था सुरू केली. त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांची शिबीरे घेत कथ्थक विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचे काम केले.

पंडीत बिरजू महाराज यांनी सत्यजीत रे यांच्या 'शतरंज के खिलाडी' या चित्रपटाला संगीत दिले होते. तर त्यांनी देवदास. देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शनही केले होते. भारत सरकारने 1983 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. तर त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड या विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट बहाल केली होती. याबरोबरच पंडीत बिरजू महाराज यांना 2002 साली लता मंगेशकर पुरस्कार यासह संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या कालिदास पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याबरोबरच 2012 साली विश्वरुपम चित्रपटासाठी बिरजू महाराज यांनी राष्ट्रीय पुरस्कार तर 2016 मध्ये बाजीराव मस्तानी या चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार पटकावला होता. त्यांना भरत मुनी पुरस्कारानेही सन्मानित केले होते.

पंडीत बिरजू महाराज म्हणत, माझ्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली होती. मात्र मला नावलौकिक आणि मानसन्मान महाराष्ट्राच्या मातीने दिला. त्यामुळे महाराष्ट्र हा माझा पिता आहे. तर बंगाल ही माझी माता आहे.

महाराष्ट्राला पिता मानणाऱ्या पंडीत बिरजू महाराज यांनी रात्री दिल्लीतील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यामुळे अखेरचा श्वास घेतला. तर बिरजू महाराज यांच्या निधनाबाबत राजकीय व कला क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे.

Updated : 17 Jan 2022 8:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top