काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अटकेत, अश्लील क्लिप पाठवून विनयभंगाची खोटी तक्रार अंगलट
सत्तेचा वापर करून अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे प्रकार वाढत आहेत. अशाच प्रकारे अवैध रेती व्यवसायाबाबत तक्रारी करणाऱ्याची बदनामी करण्याच्या हेतूने तक्रारदाराच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्यावरून महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेज पाठवल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस Adv. उमेश ठाकुर याला अलिबाग पोलिसांनी अटक केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
X
उमेश ठाकुर यांच्य अवैध रेती उत्खननाविरोधात पेण तालुक्यातील कोलेटी येथील काशीनाथ ठाकूर यांनी तक्रार केल्याने उमेश ठाकुर यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा राग मनात धरून काशीनाथ ठाकुर यांना बदनाम करण्यासाठी शुभम गुंजाळ याच्या मदतीने फेसबुकवर बनावट अकाऊंट काढले. तर फेसबुक अकाऊंटवरून ओळखीतील मनिषा चोरडेकर यांना अश्लील व्हिडीओ व मेसेज पाठवण्यास सुरूवात केली. त्यावरून मनिषा चोरडेकर यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात काशीनाथ ठाकुर यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानंतर महिलेची तक्रार असल्याने गुन्ह्याचा त्वरीत तपास करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक शैलेस सनस यांनी दिल्या. त्यानंतर सायबर सेलच्या माध्यमातून फेसबुक कंपनीशी संपर्क साधत तपास सुरू करण्यात आला. त्यामध्ये पोलिसांना शुभम गुंजाळ या प्रकरणात असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांनी शुभम गुंजाळ याची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचा मास्टरमाईंड महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अॅड. उमेश ठाकूर असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अॅड. उमेश ठाकूर, शुभम गुंजाळ आणि मनिषा चोरडेकर या तिघांनाही अटक केली. मात्र प्रकृती बिघडल्याच्या कारणामुळे उमेश ठाकुर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे उमेश ठाकुर सध्या मेडिकल कस्टडीत आहे. तर उर्वरीत दोघांना 14 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शैलेश सनस यांनी दिली. तर सायबर पोलिसांच्या तपासामुळे खोट्या गुन्ह्यांना आळा बसेल, असे मतही पोलिस निरीक्षक सनस यांनी व्यक्त केले.