कोरोना लसीकरणाचे बनावट सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे बनावट सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
X
मुंबई // कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे बनावट सर्टिफिकेट बनवून देणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. जुबेर शेख आणि अल्फैज खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते सध्या मुंबईच्या वडाळा भागात राहत असून, आरोपी हे मुळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी आहेत.
याबाबत बोलताना कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशांक शेळके यांनी सांगितले की,जुबेर नावाचा व्यक्ती कुर्ला परिसरात बनावट कोरोना लसीकरण प्रमाणपत्राचे वाटप करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींकडे एक बनावट ग्राहक पाठवला, त्याने प्रमाणपत्राची मागणी केली. आरोपींचलनी त्याला प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. तुम्ही मला फक्त तुमचा मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक आणि दोन हजार रुपये द्या, मी तुम्हाला प्रमाणपत्र देतो असे आरोपीने संबंधित व्यक्तीला सांगितले. बनावट प्रमाणपत्र देत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी आरोपी जुबेरला अटक केली.
दरम्यान , जुबेरची चौकशी सुरू असताच अल्फैजचे नाव या प्रकरणात समोर आले. पोलिसांनी दुसरा आरोपी अल्फैज यालाही वडाळा परिसरातून अटक केली. हे दोन्ही आरोपी मुळ उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी असून आता या टोळीने कोणाकोणाला बनावट प्रमाणपत्रे वाटली, या टोळीत आणखी कोणाचा समावेश आहे? याच तपास पोलिसांनी सुरु केलाय.