फेसबुकच्या पक्षपाती धोरणाचा हा घ्या पुरावा !
X
फेसबुकने लोकसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल धोरण घेतल्याचे वृत्त The Wall Street Journalने दिल्यानंतर फेसबुकने ते वृत्त फेटाळले आहे. पण फेसबुकने गाईडलाईन्सच्या नावाखाली मॅक्स महाराष्ट्रसारख्या पत्रकारितेचे मुल्य जपणाऱ्या वेब पोर्टलच्या बातम्या फेसबुकवर शेअर करण्यास बंदी घातली होती. विधानसभा निवडणुकीच्या काळात ऑक्टोबर महिन्यात फेसबुकने कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याचं सांगत मॅक्स महाराष्ट्रच्या पोस्टना १३ ते २७ ऑक्टोबर शेअरिंसाठी बंदी घातली होती. त्यावेळी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून निषेध व्यक्त केला होता.
“फेसबुक ने 13 तारखेपासून एक-एक दिवस वाढवत शेवटी 27 तारखेपर्यंत मॅक्समहाराष्ट्र वर बातम्यांच्या लिंक शेअर करण्यावर निर्बंध घातले आहेत. कम्युनिटी गाइडलाइनचं उल्लंघन केलं म्हणून टाकण्यात आलेली ही बंधनं निवडणुकीच्याच काळात कशी काय येतात, महाराष्ट्रातल्या अनेक निष्पक्ष आणि सत्य मांडणाऱ्या फेसबुक पेजेस वर अशाच स्वरूपाची बंधने घालण्यात आली आहेत. काहींना पोस्ट करण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. ही बाब गंभीर असून हा सरळ सरळ फेसबुकद्वारे निवडणूक प्रक्रीयेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे. आघाडी-बिघाडी तसंच तत्सम खोट्या बातम्या-अफवा-प्रपोगंडा पसरवणाऱ्या पेजेस फेसबुकचे जावई लागतात का, त्यावर फेसबुक कुठल्याच कम्युनिटी गाइडलाइन अंतर्गत कारवाई का करत नाही. एकूणच हा प्रकार धक्कादायक आहे. या संघर्षाच्या वेळी वाचक-प्रेक्षकांनी मॅक्समहाराष्ट्र ला सहकार्य करावं ही विनंती” - रवींद्र आंबेकर
निवडणुकीच्या काळात जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रवरच ही कारवाई का करण्यात आली होती, त्याचे उत्तर आता भाजप- फेसबुकचे संबंध उघड झाल्याने मिळाले आहे.