पुण्यात 30 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप, बड्या व्यावसायिकावर गुन्हा
X
मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही मोठ्या रकमेची खंडणी मागण्याचा गंभीर आरोप झाला आहे. तब्बल 30 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केल्याची खळबळजनक तक्रार करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका बड्या उद्योजकानेट ही खंडणी मागितल्याचा आरोप झाला असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच चौकशी सुरु करण्यात आली आहे. पुण्यातील व्यावसायिक वेनिसा डिसूजा आणि अली जाफरी यांच्यावर खंडणी मागण्याचा आरोप करण्यात आला आहे. कॅम्प परिसरात राहणाऱ्या हेमंत मोटाडू यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीवरूनच डिसूजा आणि जाफरी यांच्याविरुद्ध लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एक कोटी 36 लाख रुपयांच्या बदल्यात हेमंत मोटाडू यांनी 2013 मध्ये चऱ्होली येथे 5 हेक्टर जमीन खरेदी केली होती. मुंबईच्या हिरानंदानी प्रॉपर्टीज यांच्याशी मोटाडू यांचा रीतसर व्यवहार झाला होता. पण हीच जागा हिरानंदानी यांना अली जाफरी यांनी 2005 मध्येच हस्तांतरित केली होती. पण 2012 मध्ये जाफरी याने त्यांचे सहकारी डिसुझा यांच्यासोबत खोटी कागदपत्रे तयार करुन व्यवहार केला होता. हीच कागदपत्रे मोटाडू यांना दाखवून 30 कोटी रुपये दिल्याशिवाय जमिनीची एनओसी देणार नाही, तुझे नुकसान करणार अशी धमकी जाफरी यांनी दिल्याचा आरोप तक्रारदार हेमंत मोटाडू यांनी केला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे. तपासानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल.