नागपुरात बुलेट, पल्सर सारख्या महागड्या दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
X
नागपूर : नागपूरात एमआयडीसी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. शहरातील एका मोठ्या वाहन चोर गँगला पोलिसांनी अटक केली आहे. ही गँग शहरातील बुलेट आणि पल्सरसारख्या महागड्या दुचाकी चोरून त्यांची मध्यप्रदेशात नेवून विक्री करायचे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी मध्यप्रदेशातून चार चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांकडे गेल्या काही दिवसांपासून सतत बुलेट, पल्सर सारख्या महागड्या दुचाकी चोरी होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी ही प्रकरणे गांभीर्याने घेत तपासाची चक्र फिरवली त्यावेळी पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. दुचाकी चोरीच्या घटनांचं थेट मध्यप्रदेशसोबत कनेक्शन असल्याचं पोलिसांना तपासात समजले. त्यामुळे पोलिसांनी आणखी खोलात तपास केला.
अखेर तपासादरम्यान पोलिसांना दुचाकी चोरांची टोळीच त्यांच्या हाती लागली. पोलिसांनी याप्रकरणी मध्यप्रदेशमधील तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून 3 बुलेट, 5 पल्सर आणि एक स्प्लेनडर गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या टोळीत आणखी काही लोकांचा सहभाग आहे का? तसेच आरोपींनी आणखी काही वाहन चोरली आहेत का? याबाबत पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे याआधी सुद्धा नागपुरात मध्यप्रदेशमधील बाईक चोरांची टोळी पकडण्यात आली होती.यातील एका दुचाकी चोराचं नाव संदीप टेंभरे असं असल्याची माहिती समोर आली. इतरांची नावं समजू शकलेली नाही. तो खरंतर मध्यप्रदेशचा रहिवासी आहे. पण नागपुरात दुचाकी चोरीच्या उद्देशाने यायचा अशी माहिती समोर आली आहे.