काँग्रेस संपवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली; पंजाबमधील घडमोडींवर सामनातून सणसणीत लेख
X
पंजाबच्या राजकिय घडमोडींनमुळे देशातील राजकारणात देखील खळबळ उडाली आहे. अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षात राहणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धूंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मागील 15 दिवसांपूर्वी पंजाबचा मुख्यमंत्री बदलण्यात आले. खर तर काँग्रेसने हा अतिशय धाडसी निर्णय घेतला, पण आता काँग्रेससमोर आणखी एक मोठं संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे सिद्धूही नाराज, कॅ. अमरिंदर सिंगही पक्ष सोडण्याच्या तयारीत! याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचा नेमका काय गोंधळ उडाला, यावर भाष्य केलं आहे. काँग्रेस संपवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली, असा घणाघात करत पक्षात मूळच्या बोलघेवड्यांची कमी नाही, त्यात सिद्धूसारख्या उपऱ्यावर फाजील विश्वास टाकायला नको होता, असा चिमटा काढत संजय राऊत यांनी काँग्रेसला सल्ला देखील दिला आहे.
काँग्रेसने कॅ.अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करत नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आणले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले? असं सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
कॅ. अमरिंदर यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर कॅ. अमरिंदर हे भाजपात जातील, असे सांगितले जात होते, पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले. तेव्हा ते स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्ड्यात टाकतील, असे दिसत आहे.
कॅ. अमरिंदर म्हणतात, 'मी तीन कृषी कायद्यासंदर्भात अमित शाहांची भेट घेतली." हे सपशेल झूट आहे. मुख्यमंत्री असताना हेच अमरिंदर सिंग पंजाबच्या शेतकऱ्यांना सांगत होते, आंदोलन पंजाब मध्ये करू नका, तर दिल्लीत करा. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची ही आक्रमकता स्वराज्यात नको होती. त्यावेळी कॅ. अमरिंदर हे तीन कृषी कायद्यासंदर्भात किती वेळा दिल्लीत आले? उलट त्यांची भूमिका मोदी सरकारधार्जिणी व शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याची होती असे सांगतात. आता हे महाराज शेतकऱ्यांचे कैवारी बनले. कॅ. अमरिंदर यांना केंद्रीय कृषी मंत्रीपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. ज्यांचे वय 75 झाले. त्यांना सत्तेचे पद मिळणार नाही, असे मोदींचे धोरण आहे. कॅ. अमरिंदर यांचे वय 79 आहे. तेव्हा कसे काय होणार? असं सामनात म्हटले आहे.
सोबतच या गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. असं देखील अग्रलेखात म्हटले आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेसमध्ये आधीच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती. असं सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.