आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
X
राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आणि मान्यवरांसह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
याबैठकीत राज्यातील विमानतळे आणि काही ठिकाणी असलेल्या धावपट्ट्यांविषयी चर्चा करण्यात आली. राज्यात एकूण १५ विमानतळ असून २८ धावपट्ट्या (एअर स्ट्रीप्स) आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर होत असून शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे पाठविण्यात आल्याचे श्री.कपूर यांनी सांगितले.
विमानतळांच्या विस्तारीकरणासोबतच राज्यात असलेल्या धावपट्ट्यांचे देखील विस्तारीकरण आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्चीत करावी. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरिता वैद्यकीय मदतीसाठी देखील हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पर्यटनदृष्ट्या गोसीखुर्द, कोयना, कोकण समुद्र किनारपट्टी याभागात सी - प्लेन सुरू करण्याबाबत चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी अमरावती, शिर्डी, गोंदीया, रत्नागिरी, सोलापूर येथील विमानतळांबाबत चर्चा करण्यात आली.