थकीत वीजबिलासाठी कारवाई, शिक्षण विभागाच्या कार्यालयाची वीज तोडली
X
लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीज विभागाने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये सामान्यांसह सरकारी कार्यालयांवरही कारवाई केली जात आहे. पाली शिक्षण विभागाच्या कार्यालयाने लॉकडाऊनच्या काळातील थकीत वीजबिल न भरल्याने गट साधन केंद्र म्हणजेच गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे कनेक्श तोडण्यात आले आहे. कोरोना काळातील थकीत वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडण्याचे काम सर्वत्र सुरू आहे. याचा फटका पाली सुधागड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट साधन केंद्र म्हणजेच गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाचे १६ हजार वीजबिल थकीत असल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. वीज वितरण विभागाने याआधी सिद्धेश्वर शाळेचे देखील वीज कनेक्शन कापले होते. शैक्षणिक संस्थांची वीज तोडली जात असल्याने शिक्षण विभागच अंधारात राहिला तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे उजळणार असा सवाल इथले लोक विचारत आहेत.
गटशिक्षण अधिकाऱ्यांचे म्हणणे काय?
यासंदर्भात पाली सुधागडच्या गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, वीज बिलाच्या रकमेची तरतूद करण्यासाठीचा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठवला आहे. 31 मार्चपर्यंत ही तरतूद होणे अपेक्षित आहे. त्यानंतर वीज बिल भरले जाईल. याचा अर्थ महिनाभर तरी हे कार्यालय अंधारात असेल.
नियमानुसार कारवाई- वीज वितरण अधिकारी
कोरोना काळातील थकीत बिले लवकरात लवकर जमा करण्याचे आवाहन वीज वितरण विभागाकडून करण्यात आले होते. अशातच ठरलेल्या मुदतीत वीजबिल न भरणाऱ्या नागरिक, संस्था अथवा कार्यालयाचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी यांच्यामार्फत पाली वीज वितरण विभागाला आले. त्यानुसार वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांचे कनेक्शन तोडले जात आहे, अशी माहिती पाली सुधागड विभागाचे उप कार्यकारी अभियंता जतीन पाटील यांनी दिली.