रायगडावर वीजेचा झगझमाट केला :ऊर्जामंत्री डॉ.राऊत
X
रायगड किल्ला हा शिवछत्रपतींची राजधानी असून रायगड किल्याचा विकास व किल्ल्यावरील जुन्या व जीर्ण विद्युत वाहिन्या बदलुन वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व नूतनीकरण करण्यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीमार्फत रु. 6.04 कोटीचा निधी खर्चून किल्ल्यावर विजेचा झगमगाट केल्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज विधानसभेत सांगितले.
या कामाचा कार्यादेश दिनांक 5 मार्च 2020 रोजी देण्यात आला. रायगड किल्याला सद्यस्थितीत 22 केव्ही कलोशे उपकेंद्रामार्फत 22 केव्ही पाचाड वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. रायगड किल्ला कलोशे उपकेंद्रापासून 15 किमी आहे.
रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची अंदाजे 2850 फूट इतकी आहे. वीज कर्मचारी व कंत्राटदाराच्या कर्मचा-यांनी कोरोनाच्या काळात अवघड भौगोलिक परिस्थितीचा सामना करुन आवश्यक भूमिगत केबल (वजन अंदाजे 515 किलो) व 4 वितरण रोहित्र (वजन अंदाजे 734 किलो प्रत्येकी) हाताने ओढत व खांदयावर भार घेऊन सदर साहित्य गडावर पोचवण्यात आले.
रायगडावर सुरक्षीत आडोशाच्या ठिकाणी 4 वितरण रोहित्रे बसविण्यात आली आहेत. तसेच भूमिगत वीज वाहिन्यांमार्फत वीज वितरण करण्यात येत असल्याने याचा रायगडाच्या सौदर्यांवर कोणतीही परिणाम होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. कोकणातील व प्रामुख्याने गडावर कोसळणारा मुसळधार पाऊस व वारे यामुळे सुरक्षितता व टिकाऊपणाच्या दृष्टीने विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत.
सदर योजनेमध्ये गडावर नविन 4 वितरण रोहित्रे, 2 कि.मी. उच्चदाब वाहिनी, 3.05 कि.मी. लघुदाब तारमार्ग वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर व 2.5 कि.मी. लघुदाब वाहिनी इत्यादी कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे मार्च 2022 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे, असे मंत्री राऊत यांनी स्पष्ट केले.
महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांनी हे अतिशय आव्हानात्मक व कठीण काम शिवकार्य म्हणून एकजुटीने व आत्मीयतेने पूर्णत्वास नेले याबद्दल या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, असे निवेदन ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी विधानसभेत केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रायगड किल्ल्यास ऐतिहासिक भेट
1. महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रह आटोपल्यानंतर नंतर सन 1927 डिसेंबर मध्ये बाबासाहेबांनी किल्ले रायगडला भेट दिली होती. तेव्हा रस्ता नव्हता म्हणून बाबासाहेब नाते येथुन पार्थर्डी पर्यंत पायी चालत गेले होते. आणि विशेष म्हणजे बाबासाहेब तेव्हा बॅरिस्टर झाले होते. बॅरिस्टर झालेली ती पहिलीच व्यक्ती असेल ज्यांनी पायी रायगडला भेट दिली. शिवाय रायगडावर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. या सर्व भेटीचा वृत्तांत "बहिष्कृत भारत" यामधे उल्लेखीत आहे.
2. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. तेव्हा काही इंग्रज अधिकारी पाहुणे म्हणून किल्ले रायगडावर आले होते. त्यांना तेथील हत्ती पाहून खूप आश्चर्य वाटले. एवढे शक्तिशाली हत्ती एवढ्या उंच रायगडावर आले कसे? माहिती घेतल्यावर त्यांना अशे कळले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना किल्याचे बांधकाम करण्याच्या सुचना केल्या होत्या त्याच वेळी उदघाटनाच्या वेळेस शुभलक्षणी हत्ती असावयास पाहिजे याचे नियोजन करून किल्यावर पालखीतुन छोटया हत्तींना गडावर नेऊन ठेवले होते.
आज तशाच प्रकारे हे प्रचंड वजनाचे केबल महावितरण कर्मचाऱ्यांनी किल्ले रायगडावर आणले आहेत. याची विशेष नोंद घ्यावी लागेल असे मंत्री राऊत यांनी सांगितले.