फडणवीसांच्या शपथविधीला शिंदेंचे ग्रहण
X
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, मात्र या शपथविधीला काही तासांचा अवधी शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांनी मात्र सरकारमध्ये सामिल होण्याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत येत्या तासाभरात भूमिका स्पष्ट केली जाईल असं शिवेसना उपनेते उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. शिंदे यांच्याऐवजी इतर कुणाचंही नाव सध्या आमच्या समोर नाही असं स्पष्ट करून जर एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली नाही तर शिवसेनेतर्फे इतर कोणीही शपथ घेणार नाही असं सांगत सामंत यांनी संभ्रम वाढवला आहे.
दरम्यान शिंदे यांच्या मनधरणीसाठी भाजपातर्फे विशेष प्रयत्न होत असतानाचं चित्र दिसत नाहीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधीच आपली भूमिका स्पष्ट करून देवेंद्र फडणवीस यांना पाठींबा जाहीर केला आहे. इतर कुणी शपथ घेतली नाही तर आम्ही शपथ घेऊ असं स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची गोची केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बार्गेनिंग पॉवरच संपल्याने एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतरही भाजपने शपथविधीचा कार्यक्रम रेटून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत यंदा राज्यपालांच्या ऐवजी भारतीय जनता पक्षानेच शपथविधीची जागा, वेळ, तारिख जाहीर करून टाकली होती, त्याचबरोबरीने राज्यपाल भेटीच्या आधीच मुख्य सचिवांच्या मार्फत शपथविधीची कार्यक्रमपत्रिका आणि निमंत्रणं ही रवाना करण्यात आली होती. भाजपने आक्रमक भूमिका घेऊन दहा-बारा दिवस सुरु असलेल्या नाराजीनाट्याला आपण बळी पडत नसल्याचेच जाहीर करून टाकलं होतं.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार पूर्ण बहुमताने निवडून आलं, या यशात एकनाथ शिंदे यांचा तसंच त्यांनी आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा वाटा मोठा आहे असं शिवसेनेचं मत आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजन आणि मेहनतीमुळेच महायुती सत्तेत आली आणि भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा कोणी मुख्यमंत्री दिल्यास योग्य होणार नाही असं भाजपचं म्हणणं आहे.