समृध्दी महामार्गाच्या कामात अनेकांकडून आडकाठी, एकनाथ शिंदे यांचा रोख कुणाकडे?
X
मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृध्दी महामार्गाचे नागपूर येथे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
समृध्दी महामार्गाला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृध्दी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. मात्र या बाळासाहेबांच्या नावाने बांधण्यात आलेल्या महामार्गाच्या कामात अनेकांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा एक्सप्रेस हायवे प्रकल्प गेमचेंजर प्रकल्प आहे. महाराष्ट्र राज्याची भाग्यरेषा बदलणारा हा प्रोजेक्ट आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात बोलत होते.
सातशे किमी असलेला सर्वात मोठा प्रकल्प म्हणून या हायवेची ओळख असणार आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन होत आहे, याचा अभिमान आहे आणि आनंदही आहे. सुरुवातीपासून हा प्रकल्प होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. जमीन भूसंपादन करताना आम्ही शेतकऱ्यांना विश्वास दिला की त्यांचे पैसे वेळेवर मिळतील आणि शेतकऱ्यांनी विश्वास दाखवला. हा इको फ्रेंडली रस्ता आहे, ३५ लाख झाडे लावतो आहोत. वन्यजीवांना धोका होऊ नये, म्हणून काळजी घेतली आहे, असे असल्यामुळे हा गेमचेंजर प्रकल्प आहे, राज्याची भाग्यरेषा बदलणारा हा प्रोजेक्ट आहे,
G२० चे अध्यक्षपद आपल्या देशाला मिळणं, हा या देशाचा बहुमान आहे. त्यामुळे मुंबई,पुणे,नागपूर इथे चांगले गुंतवणूक मिळतील असाही विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.