Eknath Khadse News | एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी...! कुणी दिली धमकी? वाचा
X
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खडसे दिलेल्या माहितीवरून पोलीसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद नोंद केली आहे. १५ आणि १६ एप्रिल रोजी रात्री चार वेगवेगळ्या मोबाईलवरून धमकी दिली असल्याची माहिती खडसे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांना पहिल्यांदा फोन आल्यानंतर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा फोन आला. तर फोनमध्ये एका व्यक्तीने सांगितलं की, छोटा शकील आणि दाऊद ईब्राहिम तुम्हाला मारणार आहेत. तुम्हाला सांगितल्यानंतरही तुम्ही काहीच केले नाही, तुम्हाला ही लोकं मारणार आहेत. असी धमकी त्यांना देण्यात आली आहे. हे फोन त्यांना वारंवार येत असल्याकारणाने त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात रितसर तक्रार केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसेंना येणारे फोन हे उत्तर प्रदेश, लखनऊ आणि अमेरिकेतून आल्याची प्राथमिका माहिती दिली आहे. याअगोदर सुध्दा खडसेंना मुंबई बाँबस्फोटातील आरोपी, कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून धमकी देण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून खडसे हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खडसेंनी आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते.