संगमेश्वरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्नांना वेग
X
संगमेश्वर, २१ मे: संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील प्रभाग क्रमांक-२ मनवेवाडी, गुरववाडी, पाताडेवाडी, कुल्येवाडी/लोहारवाडी या गावांमध्ये गेल्या महिन्यापासून भीषण पाणी टंचाईची समस्या उद्भवली होती. गावातील पाणीपुरवठा प्रणाली कोलमडल्याने आणि मुख्य बंधाऱ्यातील पाणीपातळी संपूर्णपणे कमी झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच श्री प्रदीप शिंदे आणि त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य श्री अशोक तांबे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री मनोहर मुंडेकर, प्रदीप मोहीते यांनी शी महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मुंबई मंडळाच्या प्रतिनिधींसह प्रयत्न सुरू केले. त्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले आणि त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली.
या प्रयत्नांच्या अनुषंगाने, १३ मे ते १७ मे २०२४ या कालावधीत गावात पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले. आतापर्यंत तीन टँकर पाणी गावात पोहोचविण्यात आले आहे आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुढील काळातही पाणीपुरवठा सुरू राहील, असे आश्वासन पंचायत समितीचे बीडीओ यांनी दिले आहे.
ग्रामस्थांच्या गैरसोयी दूर करण्यात आल्याबद्दल पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांचे, ग्रामपंचायत सरपंच आणि सर्व ग्रामस्थांचे तसेच श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.