शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई
X
प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं आहे. टॉप ग्रुपच्या संचालक मंडळावर आर्थिक हेराफेरीप्रकरणी दिल्लीच्या टीमच्या नेतृत्त्वात ही कारवाई सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. मिळालेल्या माहीतीनुसार आ. प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगन रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी विधीमंडळात आवाज उठवला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसंच कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि किरीट सोमय्या यांनी या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईचं स्वागत केलं आहे.कंगना रणौत प्रकरणातही प्रताप सरनाईक यांनी आक्रमकपणे भूमिक मांडली होती.
कंगना रणौतने संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्याने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केली होती. विशेष म्हणजे भाजपवर टिका केल्यानंतर माझ्यावर ईडी कारवाई करेल असेही सरनाईक यांनी यापूर्वी म्हटले होते. आता या कारवाईवरुन महाविकास आघाडी आणि शिवसेनेकडून नेमकी काय कारवाई होतेय याकडे लक्ष लागले आहे.