राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे ईडीची कारवाई सुरुच, आणखी एका मंत्र्याला दणका
X
महाविकास आघाडीच्या मंत्र्याच्या पाठीमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. खंडणी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना काही दिवसांपूर्वीच अटक केली होती.आता अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे नेते आणि उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची तब्बल १३ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरू केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संबंधित नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची ९० एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. तसंच इतर ४.६ एकर जमीनही जप्त करण्यात आली आहे. हा साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून नाममात्र दरात तनपुरे यांच्याशी संबंधित कंपनीला विकण्यात आल्याचा आरोप आहे.