'पुष्पा'मुळे सापडला चोर
पुष्पा सिनेमाचा सगळीकडे ट्रेंड आहे. मात्र याच पुष्पामुळे नंदुरबार पोलिसांना चोर पकडण्यात यश आले आहे.
X
पुष्पा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून पुष्पा चित्रपटाचा ट्रेंड सर्वदुर पसरला आहे. तर युवा वर्ग सिनेमाची कॉपी करताना दिसत आहे. तसेच पुष्पा सिनेमातील डान्स, डायलॉग आणि स्टाईल लोकप्रिय ठरली आहे. तर या पुष्पाचा फायदा चोर पकडण्यासाठी होईल, असे कोणालाही वाटले नसेल. मात्र नंदुरबार जिल्ह्यात 'पुष्पा'मुळे पोलिसांना चोर पकडण्यात यश आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील डांबरखेडा येथील हरचंद कोळी या व्यक्तीचे 50 हजार रुपये दोन फेब्रुवारीला चोरी गेले होते. तर हरचंद कोळी हॉटेलवर पामी पिण्यासाठी थांबले असता आरोपीने त्यांचे पैसे चोरीस नेले. याबाबत हरचंद कोळी यांनी चोरीची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याकडे याप्रकरणाची सुत्रे सोपवली. तर पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.
पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीमध्ये वृध्दाचे पैसे चोरणाऱ्या इसमाच्या डोक्यावर 'पुष्पा' कोरले आहे, असे समजले. त्यानंतक पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सलून दुकानांशी संपर्क साधून तपास केला असता विनोद पवार नावाच्या इसमाने एका हेअर सलूनमध्ये डोक्यावर 'पुष्पा' हे नाव कोरले होते. त्यानुसार तळोदा तालुक्यातील धनपूर येथून विनोद पवार आणि राजू मोहाचे यांना अटक करण्यात आली. तर या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी चोरीचा गुन्हा मान्य केला. त्यामुळे वृध्दाच्या चेहऱ्यावर समाधान दिसले, असे पोलिसांनी सांगितले. तर 'पुष्पा'मुळे चोरी पकडली गेल्याने पोलिसांनी समाधान व्यक्त केले.