#Gulab: चक्रीवादळाचा फटका मराठवाड्याला, लाखो हेक्टर शेतीचे नुकसान
X
नांदेड : मराठवाड्यातील काही भागांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गुलाब चक्रीवादळाचा फटका पूर्ण नांदेड जिल्ह्याला बसला आहे. येत्या काही तासात हा धोका वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या २४ तासात चक्रीवादळासह मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. सोमवारपासून झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील शेतीचं मोठे नुकसान झाले आहे. गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीजवळील भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. नांदेड शहरातील जुन्या पुलाजवळ ३५१ मीटर पाण्याची पातळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे गोदावरी नदी आता धोक्याच्या पातळीजवळ येऊन पोहोचली आहे. गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. साधारणपणे ४ हजार ६९२ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होतो आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा जोरदार विसर्ग होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प देखील पूर्णपणे भरल्याने या प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या प्रकल्पातून १८७९१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात धर्माबाद, कंधार, अर्धापूर या तालुक्यासह जिल्ह्यात ३५ मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. आसना नदीला आलेल्या पुरामुळे अर्धापुर तालुक्यातील अनेक शेतीतील पीक पाण्याखाली गेलं आहे. शेलगावजवळील उमा नदीला पूर आल्याने गावाचा संपर्क काही तास तुटला आहे. यामुळे मुदखेडकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.
दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब व उस्मानाबाद तालुक्यात पाऊस जास्त झाल्याने तेरणा व मांजरा धरणातुन मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. कळंब तालुक्यात २७ व उस्मानाबाद तालुक्यात ६ जण आडकल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. त्याप्रमाणे काही नागरीकांना सुरक्षित बाहेर काढले गेले आहे. तर काहींना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेर ग्रामीण रूग्णालयात पाणी शिरल्याने येथील रुग्णांना मंगल कार्यालयात हलवले असुन नागरीकांनी वाहत्या प्रवाहाकडे जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी केले आहे.
औरंगाबाद शहराला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. शहरातील नारळीबाग परिसराला चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या परिसरातील अनेक झाडे पडली आहेत तर परिसरातील शंभर वर्षे जुने वडाचे झाड पडले आहे. झाडांच्या काही फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. ज्या नागरिकांचे नुकसान झाले त्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. काही ठिकाणी झाडे घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले आहे.