सरकारी खर्चाने नानावटी रुग्णालयात वरवरा रावांचे उपचार करा: मुंबई हाय कोर्ट
सलग तीन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असलेले भीमा-कोरोगाव प्रकरणी तुरुंगात मृत्यूशी झुंज देणारे 82 वर्षांचे तेलगू कवी वरवरा राव यांना वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करून सरकारही खर्चाने त्यांचे उपचार करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने आज दिले आहेत.
X
गेले तीन दिवस मुंबई उच्च न्यायालय संदर्भात सुनावणी सुरू होती. डॉ. वरवरा यांच्या पत्नी पेंद्याला हेमलता त्यांची ढासळती तब्येत पाहता जामिनावर मुक्तता करण्याची मागणी प्रख्यात वकील इंदिरा जयसिंग यांच्या मार्फत केली होती.मुंबई उच्च न्यायालयाने राव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना बुधवारी (18 नोव्हेंबर) त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
काल तांत्रिक बिघाडामुळे पुढे ढकलली सुनावणी आज उच्च न्यायालयाने प्रत्यक्ष घेतली.राव यांना आता दोन आठवड्यांसाठी वैद्यकीय उपचार आणि तपासणीसाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.कोर्टाच्या आदेशानुसार, राव यांच्या वैद्यकीय तपासणीचे रिपोर्ट कोर्टात सादर करावे लागणार आहे. एनआयए च्या वतीने वकील अनिल सिंग यांनी वरावरा राव यांना मुंबईतील जे जे इस्पितळात उपचार देता येतील,असे सांगितले.
"वरवरा राव यांची तब्येत ठीक नाही. जेलमध्ये त्यांच्यावर योग्य उपचार केले जात नाहीत. राव यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेलाय. ते डायपरवर आहेत. त्यांचा कॅथेटर तीन महिने बदलण्यात आला नाहीये. जेल प्रशासन त्यांच्या उपचारात हलगर्जीपणा करत आहे," असे आरोप राव यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी कोर्टात केले होते.
" मृत्यूशी झुंजणार्या ८२ वर्षाच्या व्यक्तीला वैद्यकीय उपचारांची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार आम्ही तळोजा जेलमध्ये उपचार करू, असं कसं म्हणू शकतं," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारी वकीलांनी राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर राव यांना 15 दिवस उपचार आणि तपासणीसाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्याबाबत सरकारची हरकत नसल्याची माहिती कोर्टाला दिली.जेलमध्ये राव यांचे वकील आणि कुटुंबीयांना कोव्हिड-19 च कारण देत, प्रशासन भेटू देत नसल्याचा आरोप राव यांच्या वकीलांना कोर्टात सुनावणी दरम्यान केला.कोर्टाने राव यांच्या 15 दिवसांच्या उपचाराचा खर्च सरकारने करावा तसंच रुग्णालयाच्या नियमानुसार नातेवाईकांना भेटू द्यावं असे आदेशही दिले आहेत.
कोण आहेत वरवरा राव?
वरवरा हे रिवॉल्यूशनरी रायटर्स असोसिएशनशी संलग्न आहेत. वरवरा यांना हैदराबाद इथं अटक करण्यात आली आणि त्यांना पुण्याला आणण्यात आलं.सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, नागरी हक्कांसाठी काम करणारे गौतम नवलखा, सामाजिक कार्यकर्ते अरुण फरेरा, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते व्हर्नोन गोन्सालव्हिस यांनाही अटक करण्यात आली. या सगळ्यांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला असा त्यांच्यावर आरोप आहे. वरवरा यांनी त्यांना आर्थिक मदत पुरवली, असा त्यांच्यावर आरोप आहे. पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्थानकात वरवरा यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 153 (ए), 505 (1) (B), 117, 120 (B) आणि बेकायदेशीर घडामोडी रोखण्यासाठीची कलमं 13, 16, 17, 18(B), 20, 38, 39, 40 गुन्हे दाखल करण्यात आले.
भीमा कोरेगाव प्रकरणात हिंसा भडकवणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यापासून लक्ष दूर हटावं यासाठी पोलीस कपोकल्पित प्रकरण उभं करत असल्याचा आरोप वरवरा यांनी केला होतं.वरवरा यांच्या पत्नी हेमलता यांनी गेल्या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांना एक पत्र लिहून त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. वरवरा यांना पुण्यातल्या येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. अटक झाल्यानंतर वर्षभरानंतरही खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली नव्हती.