काहीही झालं तरी आम्ही परत जाणार नाही, डॉ. तात्याराव लहाने यांनी मांडली भूमिका
जेजे रुग्णालयातील ७५० निवासी डॉक्टरांनी सुरू केलेल्या संपाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपांमुळे व्यथित होत डॉ. तात्याराव लहाने यांनी राजीनामा दिला. त्यानंतर जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केले होते. त्याला डॉ. तात्याराव लहाने यांनी उत्तर दिले.
X
२२ मार्च रोजी जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर आरोप केले. त्यानंतर प्रशासनाने डॉ. तात्याराव लहाने यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. या समितीचे प्रमुख डॉ. अशोक आनंद यांना बनवले. त्यावर डॉ. तात्याराव लहाने यांनी आक्षेप घेतला. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आम्ही घडवतो. त्या विद्यार्थ्यांनी आमच्यावर शस्त्रक्रिया चोरण्याचा आरोप करणे, वेदनादायक आहे. त्यामुळे आम्ही राजीनामा दिल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, मी १९८४ मध्ये या विभागात रुजू झालो. त्यावेळी येथे डोळ्यांच्या उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या ही ३० होती. ती संख्या सध्या ४०० वर पोहचली आहे. यामागे या विभागात करण्यात आलेले वेगवेगळे प्रयोग आणि उपचारांचा दर्जा. पण गेल्या ३० वर्षात आम्ही अनेक डॉक्टरांना घडवूनसुद्धा आमच्यावर शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. हे अत्यंत वेदनादायक आहे. त्यामुळे आम्ही ८ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत.
ज्या सेवा जे जे मध्ये माझ्यासोबतच्या सहकाऱ्याकडून दिल्या जातात. त्या इतर कुठेही दिल्या जात नाहीत.
२२ मे ला निवासी डॉक्टरांनी तक्रार केली. त्याची एकतर्फी चौकशी करण्यात आली. यावेळी आम्ही अशोक आनंद वगळता कुणाचीही या चौकशी समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली तर आम्हाला काहीही हरकत नसल्याचे सांगितले होते. पण आमचं म्हणणं ऐकून न घेता चौकशी सुरू ठेवली. त्यामुळे आम्ही राजीनामा दिला आहे. आता जे जे रुग्णालय आणि आमचा संबंध संपला असल्याचं डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांनी आम्हाला सर्जरी शिकवली जात नसल्याचा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. लहाने म्हणाले, निवासी डॉक्टरांना टप्प्याटप्प्याने शिकवलं जातं. जे राज्यातील इतर कुठेच शिकवलं जातं नाही. ते आम्ही जे जे रुग्णालयातील विद्यार्थ्यांना शिकवतो. त्यांना सिम्यूलेशन शिकवलं जातं. यासंदर्भात सगळी माहिती रेकॉर्डवर आहे. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही ला जोडले आहेत. ते पाहता येतील.
तसेच मोतीबिंदूचे ऑपरेशन तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सिनियर रेसिडेंटला ठेवलं होतं. पण अधिष्ठाता यांनी काढून टाकले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ज्युनियर रेसिडेंट शिकवतात.
राजीनामे अर्धवट - डॉ सापळे
डॉ. तात्याराव लहाने यांनी सादर केलेले राजीनामे हे अर्धवट आणि फॉरमॅटमध्ये नसल्याचे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी म्हंटले होते. त्यावर बोलताना डॉ. लहाने म्हणाले, पहिल्या दिवशीच ३१ मे रोजी राजीनामे दिले आहेत. नियमानुसार राजीनामे दिले आहेत, त्यामुळे डॉ. सापळे यांचा आरोप चुकीचा आहे.
काहीही झालं तरी माघार नाही
यापुढे काहीही झालं तरी आम्ही माघारी परतणार नाही, असं डॉ. लहाने यांनी म्हंटले. तसेच यामागे काय राजकारण आहे, याची आपल्याला काहीच कल्पना नाही. मात्र शेवटचे ऑपरेशन केले म्हणून जर माझा मुलगा डॉ. सुमित याला तुरुंगात जावं लागलं तर मला बाप म्हणून त्याचा अभिमान असेल, असं डॉ. लहाने म्हणाले.