Home > News Update > डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त राज्यभर समता कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त राज्यभर समता कार्यक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमीत्त राज्य सरकारच्या समाजिक न्याय विभागाकडून राज्यभर समता कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यभर दहा दिवस कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त राज्यभर समता कार्यक्रम
X

सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती राज्यभरात आजपासून (दि. 06) सलग दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्याचे नियोजन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने केले असून त्यासाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दि. 06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" राबविण्याचे नियोजन विभागाने केले आहे. त्यासाठी विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व देखरेख समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत विभागाचे सहसचिव, समाज कल्याण आयुक्त, बार्टी चे महासंचालक तसेच मुंबई शहराचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आदींचा समावेश करण्यात आला आहे.

कसा असेल कार्यक्रम :

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त 07 एप्रिल सामाजिक न्याय विभागाच्या सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्याबरोबरच 8 एप्रिल रोजी जिल्हा व विभाग स्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात येणार आहे.

तसेच 9 एप्रिल रोजी जेष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबवून जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयातून सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक संस्थांमधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. याबरोबरच समता दुतांमार्फत 10 एप्रिल रोजी ग्रामिण आणि शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य यातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

11 एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमीत्त विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. तर 12 एप्रिल रोजी मार्जिन मनी योजनेच्या माध्यमातून लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 13 एप्रिल रोजी संविधान जागर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबरच 14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाचे सर्व कार्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच व्याख्याने, चर्चासत्रे यासारखे कार्यक्रम घेतले जातील. याबरोबरच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. तसेच सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात येईल, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

15 एप्रिल रोजी स्वच्छता व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल.

दि. 16 एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

Updated : 6 April 2022 9:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top