Home > News Update > एनडीए सरकार स्किझोफ्रेनिया झाल्यासारखं वागतंय, अमर्त्य सेन यांचा घणाघात

एनडीए सरकार स्किझोफ्रेनिया झाल्यासारखं वागतंय, अमर्त्य सेन यांचा घणाघात

देशातील कोरोना संकटाशी लढतांना मोदी सरकार कसे चुकले याचे परखड विश्लेषण केले आहे, नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी....

एनडीए सरकार स्किझोफ्रेनिया झाल्यासारखं वागतंय, अमर्त्य सेन यांचा घणाघात
X

मोदी सरकार स्किझोफ्रेनिया झालेल्या मनोरुग्णासारखं वागल्यानेच कोविड १९ चं संकट गडद झाले. दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्या वाढली आणि सामान्य नागरिक बेहाल झाले. स्किझोफ्रेनिया या गंभीर मनोरोगात रोगी वास्तव आणि काल्पनिक जगातला फरक ओळखू शकत नाही. कोविड १९ चं संकट थांबण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोदी सरकार श्रेय उपटण्याच्या नादात होतं, असा गंभीर आरोप नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन यांनी राष्ट्र सेवा दलाच्या 'फ्रायडे फ्लेम' या कार्यक्रमात केला.

शुक्रवारी ४ जूनला राष्ट्र सेवा दलाच्या 80 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रात्री हा कार्यक्रम झाला. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी, महात्मा गांधी यांचे नातू डॉ. राजमोहन गांधी, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील यांनी देखील यावेळी आपले मनोगत मांडले. जैविक आणि वैचारिक कोरोनाविरुद्ध लढत देशातील नागरिकांच्या एकजुटीचा निर्धार यावेळी करण्यात आला. ७ मे पासून गेली पाच शुक्रवार 'फ्रायडे फ्लेम' हे ऑनलाईन अभियान सुरु होते. अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातून अमर्त्य सेन यांनी भारतीयांना संबोधित केलं.

अमर्त्य सेन यावेळी म्हणाले, भारताकडे औषध निर्मितीचं कौशल्य आहे. साथ रोगांना प्रतिकार करण्याची भारतीयांची क्षमता मोठी आहे. त्यामुळे भारताची कोरोना महामारीशी लढण्याची क्षमता चांगली होती. पण श्रेय लाटण्याचा मोदी सरकारचा नाद, विजयी होण्याची भावना या अनिष्ट गोष्टींमुळे संकट वाढले. या संकटाला निपटण्याचा चुकीचा प्रयत्न सरकारने केला आणि नागरिकांवर कोरोनाचे संकट लादले.

अमर्त्य सेन यांनी आपल्या भाषणात १७६९ साली अॅनडम स्मिथ यांनी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ दिला. अॅआडम स्मिथ यांनी या लेखात म्हटलंय की, कुणी चांगलं काम करत असेल तर त्याला त्याचं श्रेय मिळतं. अनेकदा श्रेय मिळणं हे व्यक्ती किती चांगलं काम करतोय याचे संकेत असतात. पण श्रेय उपटण्याचा प्रयत्न करणं हे बौद्धिक नादानपणाची खालची पातळी दर्शवतं. खरं तर असं करण्यापासून दूर राहिलं पाहिजे. पण एनडीए सरकारने नेमका तोच नादानपणा केला, असा घणाघाती आरोप अमर्त्य सेन यांनी केला.

भारत आधीच सामाजिक विषमता, मंदगती विकास आणि बेरोजगारीच्या संकटाशी झुंजत होता. सरकारच्या बेजबाबदार धोरणांनी कोरोना महामारीच्या संकटात हे प्रश्न जास्त स्फोटक बनत आहेत. अर्थव्यवस्थेची विफलता आणि सामाजिक एकजुटीचा उडालेला फज्जा यामुळेही भारतावरचं कोरोना संकट अधिक गडद झालं. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक नीती या क्षेत्रात मोठे सार्थक बदल केल्याशिवाय भारताला पुढे जाता येणार नाही. त्यासाठी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मार्गदर्शक ठरतील, असेही अमर्त्य सेन म्हणाले.

डॉ. राजमोहन गांधी यांनी १९४६ - ४७ या काळातल्या सारखी आजची देशाची परिस्थिती आहे, याबद्दल चिंता व्यक्त केली. हिंसा, द्वेष यांच्या विरोधात शांतताप्रेमी नागरिकांनी एकजूट करावी, अशा लोकांचं देशात असणं हीच खरी आशा आहे, असं सांगितलं. डॉ. देवी यांनी जैविक आणि वैचारिक कोरोनाविरुद्ध एकजुटीचा निर्धार देशवासीयांनी करावा, असं आवाहन केलं. आमदार कपिल पाटील यांनी अमर्त्य सेन आणि राजमोहन गांधी यांचं असणं देशाला प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली. राष्ट्र सेवा दल आर्थिक समता आणि सेक्युलॅरिझम या मूल्यांसाठी सुरु असलेला लढा अधिक तीव्र करणार असल्याचा संकल्प ८० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करत आहे, असंही डॉ. गणेश देवी आणि कपिल पाटील म्हणाले.

Updated : 5 Jun 2021 5:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top