Home > News Update > लोकांच्या भावनांशी खेळू नका : अशोक चव्हाण

लोकांच्या भावनांशी खेळू नका : अशोक चव्हाण

लोकांच्या भावनांशी खेळू नका : अशोक चव्हाण
X

मराठा आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेले विधान चुकीचे, धादांत खोटे व समाजाची दिशाभूल करणारे आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेले नाहीत, असे मी कधीही म्हणालेलो नाही. याबाबत मी जे बोललो ते सभागृहाच्या रेकॉर्डवर आहे, असे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्र सरकारचे प्रमुख कायदेशीर सल्लागार असलेले अॅटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात काय भूमिका मांडली, त्याची माहिती मी सभागृहाला दिली. १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना मागास प्रवर्गाचे आरक्षण देण्याची अधिकार राहिलेले नाहीत, हे ॲटर्नी जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितल्याचे रेकॉर्डवर आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेली सुनावणी जगजाहीर आहे. ॲटर्नी जनरल नेमके काय बोलले, ते मी दाखवू शकतो. त्यामुळे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी खोटे बोलू नये.

मराठा आरक्षणाचा कायदा सर्व राजकीय पक्षांनी मिळून पारित केला आहे. १०२ वी घटना दुरुस्ती या आरक्षणाला लागू होत नाही, हीच आमची भूमिका असून त्यादृष्टीनेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करणार आहोत. महाराष्ट्रातील मराठा आरक्षण कायद्याने व नियमानुसार दिलेले आहे. त्यामुळे अॅटर्नी जनरल यांचे म्हणणे आम्हाला मान्य नाही. पण केंद्र सरकारचे प्रमुख कायदेशीर सल्लागार सर्वोच्च न्यायालयात काही तरी वेगळे सांगतात; इकडे महाराष्ट्रात भाजपचे नेते दुसरेच काही सांगतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला माझी विनंती आहे की, मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही. या विषयावरून लोकांच्या भावनांशी खेळू नका, दिशाभूल करू नका आणि खोटेही बोलू नका.

मी काय बोललो ते प्रसारमाध्यमांमध्ये उपलब्ध आहे, सभागृहाच्या कामकाजात नोंदलेले आहे. ॲटर्नी जनरल काय म्हणाले ते सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात नमूद आहे. आ. चंद्रकांतदादा पाटील एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी अशी चुकीची विधाने करून लोकांची दिशाभूल करणे योग्य नाही. आपण सगळे मिळून मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी करूया, एवढीच माझी हात जोडून विनंती आहे.

Updated : 16 March 2021 7:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top